कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपचार सुविधांची निर्मिती; बालकांसाठी स्वतंत्र वाॅर्ड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:19 AM2021-05-21T04:19:48+5:302021-05-21T04:19:48+5:30

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रुग्णांच्या उपचारासाठी सुविधांची निर्मिती करण्यात ...

The creation of treatment facilities against the backdrop of a possible third wave of corona; Separate ward for children! | कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपचार सुविधांची निर्मिती; बालकांसाठी स्वतंत्र वाॅर्ड !

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपचार सुविधांची निर्मिती; बालकांसाठी स्वतंत्र वाॅर्ड !

Next

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रुग्णांच्या उपचारासाठी सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामध्ये ५९० जादा खाटा, वाढीव ऑक्सिजन उपलब्धता, औषधी व मनुष्यबळ उपलब्धता यासोबतच बालकांच्या उपचारासाठी स्वतंत्र कोविड वाॅर्ड सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी दिली.

कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज विविध आरोग्य संस्थांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन सज्ज असून प्रशासनामार्फत उपचार सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.

वाढीव खाटांचे असे आहे नियोजन

जिल्ह्यात सध्या शासकीय रुग्णालयांमध्ये ६४० खाटा तर खाजगी रुग्णालयांत ७६७ खाटा अशा एकूण १४०७ खाटांची उपलब्धता आहे. वाढत्या रुग्णसंख्येचे अनुमान लक्षात घेता, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात २०० खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २०० खाटांचे नियोजन असून त्यात ६० खाटा या केवळ बालकांसाठी राखीव असतील. याच ठिकाणी २० खाटांचा अतिदक्षता विभाग व ४० ऑक्सिजन खाटांची सुविधा आहे. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६० खाटा अतिरिक्त तयार करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यात २० याप्रमाणे बाळापूर, तेल्हारा, अकोट, बार्शीटाकळी याप्रमाणे एकूण ८० खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे, तर पातूर येथील आयुर्वेद महाविद्यालयात ५० असे तालुकास्तरावर एकूण १३० खाटांचे नियोजन असून एकूण ५९० खाटांची वाढ नियोजित आहे.

ऑक्सिजन निर्मिती क्षमतेत वाढ !

जिल्ह्यात सद्य:स्थितीत ७३ मेट्रिक टन इतकी ऑक्सिजन साठवण क्षमता आहे. त्यात वाढ करण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १० मेट्रिक टन क्षमतेचा अतिरिक्त ऑक्सिजन टँक बसविण्यात येत आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १० मेट्रिक टन क्षमतेचा टँक तर हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचे संयंत्र (पीएसए प्लांट) बसविण्याचेही नियोजन आहे. महाजेनकोच्या पारस येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापित होईल, तर बाळापूर, अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी, पातूर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालय येथेही पीएसए प्लांट सुरू करण्यात येणार आहे.

औषधींची उपलब्धता

राज्य टास्क फोर्सने जारी केलेल्या निर्देशांप्रमाणे कोविड रुग्णांवर करावयाच्या उपचार कार्यपद्धतीनुसार सर्व कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालये येथे उपलब्ध खाटांची संख्या विचारात घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली औषधींचे वितरण होत आहे. लहान मुलांसाठी द्यावयाच्या औषधांचीही उपलब्धता करण्यात आली आहे.

आवश्यक मनुष्यबळ

वाढीव खाटांच्या संख्येनुसार रुग्णांच्या उपचार व देखभालीसाठी लागणारे मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने आरोग्य विभागाकडून उपलब्ध करण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत मनुष्यबळाची उपलब्धता करण्याचे नियोजन हे जिल्हा शल्यचिकित्सकांकडे देण्यात आले आहे.

बालकांसाठी ६० खाटांचा विशेष कक्ष!

लहान बालकांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे स्वतंत्र वाॅर्ड तयार करण्यात येत आहे. त्यात लहान मुलांसाठी २० खाटांचा अतिदक्षता विभाग तसेच ऑक्सिजन पुरवठ्याची सोय असलेल्या ४० अशा ६० खाटांचा सुसज्ज कक्ष असेल. तसेच बालकांच्या उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर्सही नियुक्त करून डॉक्टरांचा एक टास्क फोर्स तयार करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.

Web Title: The creation of treatment facilities against the backdrop of a possible third wave of corona; Separate ward for children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.