विकास कामांचे श्रेय; शिवसेनेत खदखद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 01:52 PM2019-03-23T13:52:59+5:302019-03-23T13:53:17+5:30

अकोला: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात विविध विकास कामांचे भूमिपूजन करणाऱ्या भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेला चार हात लांब ठेवणे पसंत केले.

 Credit for development work; fustration in Shivsena | विकास कामांचे श्रेय; शिवसेनेत खदखद

विकास कामांचे श्रेय; शिवसेनेत खदखद

Next


अकोला: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात विविध विकास कामांचे भूमिपूजन करणाऱ्या भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेला चार हात लांब ठेवणे पसंत केले. या प्रकारामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत नाराजीचा सूर उमटल्याची चर्चा आहे. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी भाजप समन्वय साधणार का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपने युती असल्याचे जाहीर केले. त्यापूर्वी सत्तेत राहूनही शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका रोखठोकपणे निभावल्याचे चित्र होते. मित्रपक्ष भाजपच्या निर्णयावर शिवसेनेने सतत प्रहार केले. शेतकऱ्यांची कर्जमाफी, सोयाबीन, कापूस, तूर-हरभºयाला हमीभाव मिळत नसल्याचा आरोप करीत भाजपविरोधात राज्यभरात रान पेटविले. सेनेच्या आरोपांना भाजपकडूनही प्रत्युत्तर दिले जात असल्याने दोन्ही पक्षांत दुरावा निर्माण झाला होता. दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्तेसुद्धा एकमेकांवर तोंडसुख घेत असल्याचे चित्र होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार स्वबळाचा नारा दिल्यामुळे भाजपसोबत पुन्हा युती होणार नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे जिल्हा परिषद, महापालिका असो वा नगरपालिकांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता आहे, त्या ठिकाणी विकास कामे करताना मित्रपक्ष शिवसेनेला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले. या प्रकाराला जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपालिका व महापालिकासुद्धा अपवाद नाही. महापालिकेत भाजपाचे संख्याबळ ४८ असून, शिवसेनेचे आठ सदस्य आहेत. सत्ता स्थापन करताना भाजपने सेनेला सामावून घेतले नाही. उलट शासन निधीचे वाटप करताना सेनेला पद्धतशीरपणे डावलल्याचे चित्र होते. विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन करताना शिवसेनेचे आमदार, जिल्हाप्रमुख, नगरसेवकांना बाजूला सारण्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या प्रकारामुळे शिवसेनेत कायम अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. आज रोजी भाजप-सेनेची युती झाली असली तरी शिवसेनेच्या मनातील खदखद कायम असल्याचे बोलल्या जात आहे. यावर भाजपकडून समन्वय साधला जाणार का, आणि कधी, असा सवाल जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून उपस्थित केला जात आहे.

...म्हणून सेनेला दूर केले!
भाजपमधील दोन गटांच्या राजकारणात सेनेचा बळी गेल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे काही स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांची भाजपमधील दुसºया गटाशी वाढलेली जवळीक तसेच पडद्याआडून होणाºया मदतीमुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी आहे. म्हणूनच पक्षांतर्गत विरोधकांसह शिवसेनेला भाजपने दूर लोटल्याचे बोलल्या जात आहे.


अद्याप समन्वय नाहीच!
केंद्रात व राज्यात युतीची सत्ता असली तरी महापालिकेच्या राजकारणात भाजपने शिवसेनेची मदत न घेता एकहाती सत्ता स्थापन केली. शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात विकास कामांचा निधी वाटप करताना भाजपने भेदभाव केल्याचा आरोप नेहमीच सेनेकडून करण्यात आला. संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण अकोला शहराभोवती फिरत असताना शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून आजपर्यंतही समन्वय साधण्यात आला नसल्याची शिवसैनिक ांची खंत आहे.

 

Web Title:  Credit for development work; fustration in Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.