अकोला जिल्हा परिषद शिक्षण सभापती पांडे गुरुजीविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 10:04 AM2020-06-23T10:04:34+5:302020-06-23T10:08:26+5:30
शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी आणि काही जिल्हा परिषद सदस्यांचा अधिकाऱ्यांसोबत वाद झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी अश्लील हावभाव करीत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनास लज्जा होईल अशा प्रकारची भाषा वापरल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा परिषद शाळांच्या इमारत दुरुस्तीच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त झालेला अखर्चीत निधी शासनाकडे परत केल्याच्या मुद्यावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी आणि काही जिल्हा परिषद सदस्यांचा अधिकाऱ्यांसोबत वाद झाला होता. याच वादानंतर पांडे गुरुजी यांनी भरसभेत महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित असतानाही अश्लील हावभाव करीत महिलांच्या मनाला लज्जा होईल अशा प्रकारची भाषा वापरली होती. त्यामुळे गत दोन दिवसांपासून हा वाद सुरू असतानाच संबंधित महिला अधिकारी यांनी सोमवारी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात सदर प्रकाराची तक्रार केली. या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी शिक्षण सभापती पांडे गुरुजी यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ५०६ तसेच ५०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेत झालेल्या सभेत नेमका काय गोंधळ झाला, याची माहिती घेण्यात येत आहे; मात्र संबंधित महिला अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- उत्तमराव जाधव
ठाणेदार, सिटी कोतवाली
सभागृहात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मी दिले. शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीच्या कामांसाठी प्रस्तावासंदर्भात त्या अधिकारी माझ्याशी ज्या बोलल्या तेच मी सभागृहात सांगितले. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. तसेच सभागृहातील विषय असल्याने यासंदर्भात चौकशी न करता दाखल करण्यात आलेले गुन्हे चुकीचे आहेत.
-चंद्रशेखर पांडे
शिक्षण सभापती, जिल्हा परिषद