कोरोनाच्या भीतीने रस्ता अडविणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 10:46 AM2020-04-08T10:46:27+5:302020-04-08T10:46:41+5:30
अफवा पसरविल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
अकोला : जुने शहरातील गजानन नगर परिसरातील आठ जणांनी कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या भीतीने रस्ता अडविल्यानंतर या परिसरातील एका इसमास कोरोना झाल्याची अफवा पसरविल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
जगभरात थैमान घालणाºया कोरोना या संसर्गजन्य विषाणूचे रुग्ण देशासह राज्यात मोठ्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली असून, केंद्र शासनानेही १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’ केले आहे; मात्र त्यानंतरही काही जण रस्त्यावर फिरत असल्याने अनेकांनी रस्ते अडविले आहेत. अशाच प्रकारे जुने शहरातील गजानन नगर परिसरात एका इसमाला कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची अफवा वाºयासारखी पसरविण्यात आली. त्यानंतर गजानन नगरातील एक रस्ता टिन पत्रे, लाकडे व दोर बांधून अडविण्यात आला होता. हा मुख्य रस्ता अडवल्यामुळे तसेच एकाला कोरोना पॉझिटिव्ह आल्याची अफवा केल्यामुळे पोलिसांनी याच परिसरातील रहिवासी विजय चंदन, प्रदीप सोळुंके, किरण चिंचोळकर, आकाश निंबोकार, किशोर इंगळे, जयदीप पाटील, अजय भारकर, रवींद्र यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३४१, ५०५ ३४ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील हा पहिला गुन्हा असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यामुळे कोरोनासंदर्भात अफवा पसरविणे तसेच मॅसेज व्हायरल करणे प्रतिबंध करण्यात आला आहे; मात्र त्यानंतरही कुणीही अशाप्रकारे मेसेज व्हायरल केल्यास किंवा अफवा पसरविल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.