विधिज्ञासह पाच अवैध सावकारांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: June 4, 2017 04:59 AM2017-06-04T04:59:31+5:302017-06-04T04:59:31+5:30
एका विधिज्ञासह पाच अवैध सावकांराविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : रणपिसे नगरातील रहिवासी तसेच व्यवसायाने वकील असलेल्या एका विधिज्ञासह पाच अवैध सावकांराविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार, शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या आरटीओ रोडवरील गिरी नगरातील रहिवासी मनीष गोपाळराव देशमुख यांनी तालुका उपनिबंधक सुरेखा फु पाटे यांच्याकडे शहरातील अवैध सावकारांची तक्रार केली होती. या तक्रारीवर उपनिबंधक फुपाटे यांनी मनीष देशमुख आणि त्यांच्यासोबत व्यवहार करणारे अॅड. सुनील लक्ष्मीप्रसाद अग्रवाल, हेमंत भगीरथ मिश्रा आणि विवेक खत्री तसेच वृद्ध असलेले लोडिया दाम्पत्य यांच्या दस्तावेजांची तपासणी केली. या तपासणीमध्ये उपनिबंधकांच्या कार्यालयामध्ये मनीष देशमुख व अवैध सावकार यांची सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीमध्ये तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियमाच्या कलम १६ नुसार दस्तावेजांची तपासणी केली असता सदरचा व्यवहार हा अवैध सावकारीचा असल्याचे समोर आले. त्यामुळे सावकारी अधिनियमाची योग्य पद्धतीने व प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर उपनिबंधक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची प्राधिकृत म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर डी. एस. जंजाळ व इतरांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात रणपिसे नगरातील रहिवासी अॅड. सुनील लक्ष्मीप्रसाद अग्रवाल, विवेक खत्री, हेमंत मिश्रा, सुधाकर लोडिया आणि त्यांची पत्नी यांच्याविरुद्ध अवैध सावकारी प्रकरणाची तक्रार दिली. या तक्रारीनुसार, रामदासपेठ पोलिसांनी सदर पाच आरोपींविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम ३९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध सावकारांविरुद्ध तालुका उपनिबंधक कार्यालयातून प्राप्त तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींचे व्यवहार हे अवैध सावकारीचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये तालुका उपनिबंधक कार्यालयाचा अहवाल महत्त्वाचा आहे.
शैलेश सपकाळ,ठाणेदार, रामदासपेठ, अकोला.
मनीष देशमुख यांच्यासोबत शहरातील काही लोकांनी पैशांच्या घेवाण-देवाणचा व्यवहार केला आहे. या व्यवहारातील दस्तावेजांची तपासणी केली असता तो व्यवहार अवैध सावकारीचा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आणि दोन्ही पक्षांच्या सुनावणी घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
सुरेखा फुपाटे,तालुका उपनिबंधक.सहकारी संस्था, तालुका अकोला.