व्यापारी आत्महत्येप्रकरणी रिसोडच्या मुख्याधिका-यांसह चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2016 01:26 AM2016-04-11T01:26:00+5:302016-04-11T01:26:00+5:30
कल्पेश वर्माच्या आत्महत्या प्रकरणास तीन दिवसांनंतर कलाटणी; नगरसेविकेवरही फौजदारी.
रिसोड (वाशिम) : येथील व्यापारी युवक कल्पेश वर्माच्या आत्महत्या प्रकरणास तीन दिवसांनंतर कलाटणी मिळाली आहे. भूखंडाच्या व्यवहारातून आत्महत्या करणार्या कल्पेशला षडयंत्र रचून त्रास दिल्याप्रकरणी रिसोड नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर झाडे, तसेच नगरसेविका मीना अग्रवाल यांच्यासह चार जणांविरूद्ध रिसोड पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला.
कल्पेशचा भाऊ गोविंद वर्मा यांनी रिसोड पोलीस ठाण्याला यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार, सुनील रामकृष्ण बगडीया यांनी २00४-0५मध्ये रिसोड येथे केलेल्या एका जमिनीच्या खरेदीमध्ये कल्पेश वर्मा हा भागीदार होता. हा व्यवहार एकूण पाच प्लॉटचा होता. त्यापैकी दोन प्लॉट सुनील बगडीया आणि त्यांच्या भावाच्या नावाने, तर इतर तीन प्लॉट ताराचंद वर्मा व त्यांच्या कुटुंबातील अन्य दोन सदस्यांच्या नावावर होते.
वाशिमच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून १ सप्टेंबर २0१५ रोजी ताराचंद वर्मा यांना भाडेपट्टयावर प्लॉट मिळाला. मध्यंतरीच्या काळात सुनील बगडियानी त्यापैकी अर्धा प्लॉट त्याला मिळावा, यासाठी ताराचंद वर्मा यांच्याकडे तगादा लावला. त्यांनी नकार दिल्यानंतर बगडीया यांनी नगरसेविका मीना अग्रवाल, त्यांचे पती अशोक अग्रवाल यांना हाताशी धरून वर्मा यांना त्रास देणे सुरू केले. नंतर रिसोड पालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर पानझडे यांना हाताशी धरून वर्मा कुटुंबाच्या सामुहिक मालकीचे बांधकाम पाडण्याची नोटीस १८ मार्च २0१६ रोजी बजावण्यात आली. या नोटिशीवर वर्मा यांनी न्यायालयाकडून मनाई हुकूम आणू नये, यासाठी त्यांनी रिसोड व वाशिममध्ये कॅव्हेटही दाखल केले. तेव्हापासून आमचे कुटुंब तणावाखाली होते, असे फिर्यादीत वर्मा यांनी नमूद केले.
ताराचंद वर्मा यांचा मुलगा कल्पेश हा जास्तच तणावाखाली होता. त्यातूनच त्याने ७ एप्रिल रोजी रात्री आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये अशोक अग्रवाल आणि इतर तिघांच्या त्रासाचा उल्लेख केला होता. त्यानंतर कल्पेशच्या आत्महत्येस मीना अग्रवाल, त्यांचे पती अशोक, सुनील बगडीया आणि सुधाकर पानझडे हे कारणीभूत असल्याची तक्रार गोविंद वर्मा यांनी पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून रिसोड पोलिसांनी चौघांविरूद्ध भादंविचे कलम ३0६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.