राष्ट्रवादी, भारिप व सेनेच्या चार प्रचार वाहनचालकांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: October 8, 2014 01:03 AM2014-10-08T01:03:07+5:302014-10-08T01:03:07+5:30
अकोला येथील तीन पोलिस ठाण्यांमध्ये चार गुन्हे.
अकोला : धावत्या वाहनातून प्रचार करून दिलेल्या परवानगीचे उल्लंघन करून आचारसंहितेचा भंग केल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ व शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार्या चार वाहनचालकांवर सिव्हिल लाईन, रामदासपेठ व कोतवाली पोलिसांनी मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल केला. निवडणूक विभागाच्या भरारी पथकाचे प्रमुख गजानन शिवाजीराव गावंडे व ओंकार उदेभान डांगे यांच्या तक्रारीनुसार, भारिप-बमसंचे उमेदवार हरिदास भदे यांचा प्रचार संघपाल साहेबराव उमाळे एमएच ३0 पी ३८१२ क्रमांकाच्या ऑटोरिक्षातून करीत आहे. संघपाल हा शिवर पॉईंटवर दुपारी १२ वाजताच्या सुमारास धावत्या ऑटोतून प्रचार करीत असल्याचे दिसून आले. तसेच शिवणी परिसरात राहणारा राहुल विनायक वानखडे हा एका ठिकाणी न थांबता त्याच्या एमएच ३0 एए २२२९ क्रमांकाच्या ऑटोरिक्षातून अपक्ष उमेदवार प्रवीण वासुदेवराव जगताप यांचा प्रचार करीत असल्याचे दिसून आल्याने सिव्हिल लाईन पोलिसांनी दोन्ही वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस शि पाई अमीत तीर्थराज पांडेय यांच्या तक्रारीनुसार खिडकीपुर्यातील तन्वीर अहमद अब्दुल मोबीन (२४) हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिरीष धोत्रे यांचा त्याच्या धावत्या एमएच ३0 एए ५९९0 क्रमांकाच्या ऑटोरिक्षातून रेल्वे मालधक्क्याजवळ प्रचार करताना दिसून आला तर चौथी तक्रार कोतवालीचे ठाणेदार अनिरुद्ध आढाव यांनी केली. त्यांच्या तक्रारीनुसार सेनेचे उमेदवार गुलाबराव गावंडे यांचा धावत्या ऑटोरिक्षातून मनोज हिंमतराव चावरे हा प्रचार करताना मिळून आला. चारही वाहनचालकांविरुद्ध भादंवि कलम १८८, १३४, १३५ बीपी अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.