पत्नीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 02:27 PM2019-10-20T14:27:14+5:302019-10-20T14:27:36+5:30
पत्नीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्याचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा रोडवरील रहिवासी असलेल्या विवाहितेने तिच्या पतीपासून घटस्फोट मिळविण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पतीने पत्नीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्याचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी शैलेश दहिमीवाल नामक पतीविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हिंगणा रोडवरील रहिवासी अमृता ऊर्फ अंबू नामक तरुणीचा अहमदनगर जिल्ह्यातील मालुजा बु. येथील शैलेश दहिमीवाल याच्यासोबत विवाह झाला होता. शैलेश याचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे औषधीचे दुकान होते. लग्नानंतर पतीने तिला महागडा मोबाइल आणि व्होडाफोनचे सीम कार्ड घेऊन दिले होते; मात्र त्यानंतर पतीकडून वारंवार होणाºया शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून अंबू ही माहेरी राहायला आली होती. त्यानंतर तिने पतीपासून विभक्त राहण्याचा निर्णय घेऊन कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी धाव घेतली होती. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे; मात्र आॅगस्ट २०१९ मध्ये अंबूजवळ असलेल्या मोबाइलचा गैरवापर करून पती शैलेश दहिमीवाल याने कपिल हिरुळकर नामक व्यक्तीला आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला. कपिल याने या पोस्टबाबत विचारणा करण्यासाठी आलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, कपिलने बहिणीसोबत संपर्क साधून सुरू असलेला प्रकार तिच्या कानावर टाकला.
कपिलकडून विचारपूस करण्यात येत असल्याची माहिती मिळताच तिच्या पतीने आॅगस्ट २०१९ मध्ये सीमकार्ड बंद केले. यासंदर्भात संबंधित कंपनीकडे चौकशी केली असता सीम कार्ड अहमदनगर येथून बंद केले असून, सदर क्रमांकावरच दुसरे सीम कार्ड घेतल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. त्यानंतर अंबूने आॅक्टोबर २०१९ मध्ये तिचे स्वत:चे फेसबुक अकाउंट चेक केले असता तिचे फोटो अन्य व्यक्तीला टॅग केल्याचे दिसले. यावरून तिने खोलात जाऊन माहिती घेतली असता ९ आॅक्टोबर रोजी तिच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडण्यात आल्याचे वास्तव समोर आले. तिने सदरचे फेसबुक प्रोफाइल तपासले असता, या बनावट अकाउंटवर तिचे छायाचित्र दिसले. एवढेच नव्हे, तर एका मैत्रिणीच्या पतीलादेखील याच अकाउंटमधून फ्रें ड रिक्वेस्ट पाठवून चॅटिंग केल्याचे वास्तव समोर आले. त्यामुळे अंबूने या पुराव्यासह खदान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.