बनावट स्वाक्षरीद्वारे ४५ लाखांचे शासकीय धनादेश वटविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:18 AM2020-12-22T04:18:35+5:302020-12-22T04:18:35+5:30
अकाेला : आदर्श काॅलनी येथील मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करीत सुमारे ४५ लाख रुपयांचे शासकीय धनादेश स्वत:च्या खात्यात ...
अकाेला : आदर्श काॅलनी येथील मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करीत सुमारे ४५ लाख रुपयांचे शासकीय धनादेश स्वत:च्या खात्यात जमा करणाऱ्या बाबा राेडवेज या ट्रान्सपाेर्ट कंपनीचा संचालक माे. साउद याच्याविरुद्ध खदान पाेलिसांनी शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कार्यालयामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी केली जाते. त्यानंतर हा माल विविध राज्यांत तसेच जिल्ह्यात पाठविण्यात येते. यासाठी मार्केटिंग फेडरेशनने माल वाहतुकीसाठीचा कंत्राट अकाेल्यातील बाबा राेडवेज या ट्रान्सपाेर्ट कंपनीला दिला हाेता. या ट्रान्सपाेर्टचा संचालक माे. साउद तकदीरउल्ला खा याने मार्केटिंग फेडरेशनच्या आदर्श काॅलनी येथील कार्यालयातून ४५ लाख रुपयांचे शासकीय धनादेश घेऊन त्या धनादेशावर मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करीत ताे स्वत:च्या खात्यात जमा केला होता. हा प्रकार २०१९ मधील ऑक्टाेबर व नाेव्हेंबर महिन्यात घडला. हा प्रकार उघड झाल्यानंतर मार्केटिंग फेडरेशनच्या मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तक्रार पाेलिसांत करण्याचे निर्देश दिले. यावरून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी शेख जलाल यांनी शुक्रवारी खदान पाेलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पाेलिसांनी बाबा राेडवेज ट्रान्सपाेर्टचा संचालक माे. साउद याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास खदानचे ठाणेदार डी. सी. खंडेराव करीत आहेत.
मार्केटिंग फेडरेशनचे एमडी अकाेल्यात
या गंभीर प्रकरणात तातडीने लक्ष घालून मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक दाेन दिवसांपूर्वी अकाेल्यात दाखल झाले. त्यांच्याच निर्देशानंतर जिल्हा मार्केटिंग अधिकारी शेख जलाल यांनी खदान पाेलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. हे प्रकरण दडपण्यासाठी माेठे प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारीही संशयात
मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयातून ४५ लाख रुपयांचे धनादेश चाेरी करीत त्यावर बनावट स्वाक्षरी करून ते वटविण्याचा प्रकार धक्कादायक आहे. त्यामुळे या प्रकरणात मार्केटिंग फेडरेशनच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एका शासकीय कार्यालयाच्या लाॅकअपमधून धनादेश घेऊन जाणे व वटवीने हे बाहेरच्या व्यक्तीला शक्य नसल्याने त्याच्यासाेबत कार्यालयाचा कुणीतरी मिळालेला असल्याची शक्यता आहे.