आधी पैसे घेतले; नंतर म्हणाला जा देत नाही! पैसे घेणाऱ्यावर केला हल्ला; पोलिसांत गुन्हा दाखल
By आशीष गावंडे | Published: January 24, 2024 06:25 PM2024-01-24T18:25:36+5:302024-01-24T18:26:03+5:30
याप्रकरणी सिव्हील लाइन पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून २३ जानेवारी रोजी आरोपीविरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला: पैशांची उसनवारी करणे एका युवकाच्या अंगलट आली आहे. उधार पैसे घेणाऱ्या युवकाने पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. यातून वाद निर्माण हाेऊन पैसे परत मागणाऱ्या युवकाने फिर्यादीच्या डाेक्यात लाेखंडी पाइपने हल्ला चढवित जखमी केल्याची घटना २१ जानेवारी रोजी माेठी उमरी परिसरात घडली. याप्रकरणी सिव्हील लाइन पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून २३ जानेवारी रोजी आरोपीविरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयुर राजेश ठाकरे (२८) रा. मते कॉम्पलेक्स, माेठी उमरी असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. यातील मारहाण करणारा युवक मंगेश मेहत्रे (१९) रा. कदम मार्केट, हे दोद्येही चांगले मित्र आहेत. त्यांच्यामध्ये आर्थिक देवाण-घेवाणीचे व्यवहार होत असतात. यातील मयूर याने मंगेश याच्याकडून एक महिन्यापूर्वी एक हजार रूपये घेतले होते. त्यानंतर पंधरा दिवसांनंतर मंगेशने पैसे परत मागितले. त्यावर फिर्यादीने आरोपीला पैसे नसल्याचे कारण पुढे करून पैसे देत नाही, तुझ्याकडून जे होते ते करून घे,असे बाेलल्यामुळे दाेघांमध्ये शाब्दीक खडाजंगी झाली हाेती. त्या वादातून मयूरने मंगेशला मारहाण केली होती. २१ जानेवारी २०२४ रोजी रात्री मयूर ठाकरे घराजवळ उभा हाेता. तिथे आरोपी मंगेश मेहगेने मयुरला पैशांची मागणी केली. परंतु सध्या पैसे नसल्याचे मयुरने सांगितले. त्यामुळे संतापलेल्या मंगेशने मयूरच्या डोक्यावर लोखंडी पाईप मारून जखमी केले. वैद्यकीय अहवाल व सिव्हील लाइन पोलिस स्टेशनमध्ये मयूर ठाकरे याने दिलेल्या तक्रारीवरून मंगेश मेहत्रे याच्याविरूध्द भादंविच्या कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदिप सिरस्कार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बालोद करीत आहेत.