धनादेश अनादर प्रकरण; महिलेस कारावासाची शिक्षा, साडे पाच लाखांचा ठोठावला दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 02:55 PM2022-09-07T14:55:33+5:302022-09-07T15:16:05+5:30
सुधीर कॉलनी येथील रहिवासी स्वाती अनुप आगरकर या महिलेने डोडिया नामक व्यक्तीकडून तीन लाख रूपये घेतले होते.
सचिन राऊत
अकोला - धनादेश अनादर प्रकरणी सुधीर कॉलनी येथील रहिवासी असलेल्या स्वाती अनुप आगरकर या महिलेस तिसरे अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी यांनी पाच लाख ५० हजार रुपयांचा दंड आणि तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. सोबतच दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सुधीर कॉलनी येथील रहिवासी स्वाती अनुप आगरकर या महिलेने डोडिया नामक व्यक्तीकडून तीन लाख रूपये घेतले होते. यावेळी रक्कमेची परतफेड करण्याकरिता धनादेश दिला होता. हा धनादेश फिर्यादीने वटविण्यासाठी खात्यात लावला असता रक्कम नसल्याने अनादरीत झाला. न्यायालयात धाव घेत प्रकरण दाखल केले.
न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून या प्रकरणात आरोपी स्वाती अनुप आगरकर यांना दोषी ठरवीत साडे पाच लाख रुपये दंड भरण्याचे आदेश दिला. सोबतच तीन महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुद्धा यावेळी तिसरे अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने सुनावली.