क्राईम रेट घसरला मात्र पोलिसांवरील ताण वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:16 AM2021-03-24T04:16:32+5:302021-03-24T04:16:32+5:30
लॉकडाऊन काळात १६८ पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना कोविडची लागण, एकाचा मृत्यू सचिन राऊत अकोला : कोविड-१९ या संसर्गजन्य विषाणूची मार्च ...
लॉकडाऊन काळात १६८ पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना कोविडची लागण, एकाचा मृत्यू
सचिन राऊत
अकोला : कोविड-१९ या संसर्गजन्य विषाणूची मार्च २०२० मध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे २४ मार्चपासून लॉकडाऊन लावण्यात आले. न भुतो न भविष्यति अशा या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील क्राईम रेट घसरला. मात्र, तळपत्या उन्हात रात्रंदिवस पोलीस रस्त्यावर बंदोबस्तात होते. या काळात पोलिसांवरील ताण प्रचंड वाढल्याचे दिसून आले. त्यामुळेच जिल्ह्यातील सुमारे १६८ अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना कोविडची लागण झाली, तर कोरोनामुळे एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
कोविडमुळे देशभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यामुळे बहुतांश उद्योगधंदे व्यवसाय बंद होते. या काळात बेरोजगारांचे प्रमाण प्रचंड वाढले. त्यामुळे गुन्हेगारीही बऱ्याच प्रमाणात वाढल्याची चर्चा होती. मात्र, अकोला जिल्हावगळता बहुतांश जिल्ह्यात चोऱ्या, लूटमार, जबरी चोरी, घरफोडी यासह कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. मात्र, अकोला जिल्ह्यात याच गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिली. कोरोनाच्या काळात पोलीस गुन्हेगारी वगळता बंदोबस्तासाठी रात्रंदिवस रस्त्यावर तैनात होते. त्यामुळे सुमारे १६८ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. या कोरोनामुळे एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यूही झाला आहे. पोलीस एकीकडे गुन्हेगारी तपास शोध व फसवणूक यांसारख्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यात अडचणी निर्माण झालेले असताना दुसरीकडे पोलिसांवर लॉकडाऊन व संचारबंदीचे नियम अबाधित ठेवण्यासाठी रात्रंदिवस बंदोबस्तात व्यस्त राहावे लागले. त्यामुळे गुन्हेगारी घटली असली तरी पोलिसांवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले.
कामाच्या शैलीत बदल
शासनाने कोरोना संसर्गाच्या कालावधीत सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्क वापरणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे हे बंधनकारक केले. त्यामुळे सर्वात आधी या सर्व बाबींचा वापर करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. पोलीस मास्क वापरून तसेच सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करीत असल्याचे दिसून आले. मात्र, नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती आहे. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर यांसारखे कोरोनाला रोखण्यासाठीचे शस्त्र वापरून पोलिसांनी कामाच्या शैलीत बदल केलेला आहे.