‘वंचित’च्या ‘कमळ’ आंदोलकांवर गुन्हे दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 10:56 AM2020-08-19T10:56:49+5:302020-08-19T10:57:01+5:30
दुसरीकडे इतर पक्षाच्या आंदोलकांवर मात्र पोलिसांनी मेहरनजर दाखविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वंचित बहुजन आघाडीने रविवारी शहरातील ११ ठिकाणी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमधील साचलेल्या पाण्यात कमळाची फुले ठेवून आंदोलन केले. या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.
एकीकडे वंचितच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले असतान दुसरीकडे इतर पक्षाच्या आंदोलकांवर मात्र पोलिसांनी मेहरनजर दाखविली आहे. जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करताना असे शेकडो गुन्हे दाखल झाले तरी चालतील, असे स्पष्ट करत आंदोलनाबाबतचा हाच न्याय सर्व पक्षांना लावावा, अशी मागणी वंचितचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीने मनपामधील सत्ताधारी भाजप विरोधात आंदोलन केले.
त्यावर सिटी कोतवाली, रामदासपेठ, सिव्हिल लाइन्स आणि अकोट फैल पोलीस स्टेशनमध्ये पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांविरोधात कलम १८८, १४३, २६९ सह १३५ आणि कोविड १९ साथ रोग नियंत्रण कायदा इतर कलमे लावून गुन्हे दाखल केले आहेत.
ही आंदोलने बेदखल का?
राष्ट्रवादीने बोगस बियाण्यांविरोधात कृषी अधिकारी कार्यालयात पेरणी केली आहे. काँग्रेसने याच मुद्यावर महाबीजमध्ये ठिय्या आंदोलन दिले आहे आणि वीज बिल विरोधात वीज मंडळ कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. सेनेच्या वतीने दोन वेळा जिल्हाभर रस्ता रोको आणि जुते मारो आंदोलने झाली आहेत. भाजपानेदेखील दोन वेळा जिल्हाभर दूध दरवाढ व इतर मुद्यांवर जवळजवळ ४२ ठिकाणी आंदोलने केली आहेत.
कालही भाजपच्या उपमहापौर आणि काही पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे. या राजकीय पक्षांनी केलेल्या आंदोलनाला पोलीस परवानगी नव्हती; मात्र एकाही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला नाही. केवळ वंचितच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना लक्ष्य करून गुन्हे दाखल केले जात असतील तर पोलीस सत्ताधारी राजकीय पक्षाच्या हातचे बाहुले म्हणून काम करीत असल्याचा आरोप पातोडे यांनी केला आहे.