पीक विमा प्रक्रियेत शेतकऱ्यांवर अन्याय केल्यास फौजदारी कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 10:30 AM2021-07-26T10:30:35+5:302021-07-26T10:30:44+5:30
Agriculture Minister Dadaji Bhuse warn insurance companies : फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित विमा कंपनीसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना रविवारी येथे दिला.
अकोला: अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पीक नुकसानीचा आढावा घेत, पीक विमा योजनेच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित विमा कंपनीसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना रविवारी येथे दिला. (Agriculture Minister Dadaji Bhuse warn insurance companies)
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार नितीन देशमुख, आमदार अमोल मिटकरी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, जिल्हाधिकारी निमा अरोरा, डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ.विलास भाले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह संबंधित विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेती आणि पीक नुकसानीसह प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांची माहिती कृषी मंत्र्यांनी यावेळी घेतली. पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ९० हजार शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून पीक नुकसानीची तक्रार व अर्ज दाखल करण्यासाठी विमा कंपनीचे संकेतस्थळ हँग किंवा बंद असल्यास संबंधित विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश कृषीमंत्री भुसे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले. तसेच पीक विमा प्रक्रियेत शेतकऱ्यांवर अन्याय केल्यास विमा कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असून, या कामात हलगर्जी करणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कृषीमंत्र्यांनी दिला. पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांकडून पीक नुकसानीचे तक्रारी अर्ज कृषी विभाग, महसूल विभागासह संबंधित बँकांनी स्वीकारुन त्यांनी ते अर्ज विमा कंपनीकडे सादर करण्याचे निर्देशही कृषीमंत्र्यांनी दिले. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष विजय देशमुख, राजेश मिश्रा, अतुल पवनीकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात ५४ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा अंदाज!
जिल्ह्यात खरीप हंगामातील एकूण पेरणी क्षेत्राच्या तुलनेत ९६ टक्के पेरण्या झाल्या असून, अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात ५४ हजार ४३२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कांतप्पा खोत यांनी बैठकीत दिली.