अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारांची टोळी दाेन वर्षांसाठी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 07:53 PM2021-12-22T19:53:37+5:302021-12-22T19:53:51+5:30
Crime News : पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने बुधवारी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
अकोला : जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीसह जिल्ह्यातील विविध भागात टाेळीने गुन्हे करणाऱ्या जुने शहरातील गवळीपुरा येथील रहिवासी असलेल्या दाेन जणांच्या टाेळीला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने बुधवारी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत टाेळीने गुन्हे करणारे तसेच गवळीपुरा व शिवसेना वसाहत येथील रहिवासी कैलास ईश्वर बाेंडफळे (वय २५ वर्षे), दिनेश विठ्ठलराव दहीकर (वय ३५ वर्ष) हे दाेघे जण शहरासह जिल्ह्यात टाेळीने गुन्हे करीत असल्याची माहिती पाेलीस अधीक्षकांना मिळाली. या माहितीवरून या टाेळीतील गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता, दाेन जणांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून जुने शहर पोलिसांनी या टाेळीतील दाेन गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली. जुने शहर पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात या गुन्हेगारी टाेळीतील दाेन जणांनी टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली. मात्र, गुन्हेगार पाेलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने त्यांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.