उमरा परिसरात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:14 AM2021-06-21T04:14:36+5:302021-06-21T04:14:36+5:30
यावर्षी पावसाने सुरुवातीला दमदार आगमन करून शेतकरी मान्सूनपूर्व पावसाने संकटात सापडला आहे. ६ जूनला पावसाने हजेरी लावल्याने ...
यावर्षी पावसाने सुरुवातीला दमदार आगमन करून शेतकरी मान्सूनपूर्व पावसाने संकटात सापडला आहे. ६ जूनला पावसाने हजेरी लावल्याने उमरा परिसरात नियमित पाऊस पडल्याने उमरा परिसरातील शेतकऱ्यांनी १० जूनपासून पेरणी करण्यास सुरुवात केली. बैलजोडी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने जवळपास ७० टक्के पेरणी आटोपली. सोयाबीन व कपाशी, तूर, उडीद, मूग, ज्वारी बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना आधीच बियाणे मिळविण्यासाठी आर्थिक जुळवाजुळवी करावी लागली. कृषी विभागाने तूर्त पेरण्या करू नका असा सल्ला दिल्यानंतरही उमरा परिसरात अनेकांनी कोरडवाहू पेरणी केल्या. नंतर बियाणे अंकुरले; मात्र वाढत्या तापमानामुळे अंकुरलेले बियाणे जागेवरच कुजत आहेत. मात्र, आता ज्या शेतकऱ्यांजवळ सिंचनाची व्यवस्था आहे. त्यांना पुरेशी वीज मिळत नाही. यामुळे सिंचनही रखडले आहे. यातून शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. आधीच लाॅकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज काढून यंदा खरीप हंगामाची नव्या जोमाने तयारी केली. मात्र, पेरणी केल्यानंतर एक आठवड्यापासून पाऊस नाही. त्यामुळे अंकुरलेले बियाणे करपण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
फोटो:
सुरुवातीला चांगला पाऊस आल्यामुळे पेरणी केली. पेरणी केल्यानंतर बियाणे अंकुरले; मात्र आता पावसाने दांडी मारल्याने अंकुरलेले बियाणे कुजत आहेत.
- विजयसिंह तोमर, शेतकरी उमरा