शेतकऱ्यांच्या बारा महिन्यांच्या खेपीवर दरवर्षी संकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:15 AM2021-06-26T04:15:06+5:302021-06-26T04:15:06+5:30
खरीप हंगामातील पिकांवर व्हायरसची भीती: शेतकरी मेटाकुटीस प्रशांत विखे तेल्हारा : शेतकऱ्यांची बारा महिन्यांची खेप म्हणजे खरीप हंगाम. गेल्या ...
खरीप हंगामातील पिकांवर व्हायरसची भीती:
शेतकरी मेटाकुटीस
प्रशांत विखे
तेल्हारा : शेतकऱ्यांची बारा महिन्यांची खेप म्हणजे खरीप हंगाम. गेल्या काही अनेक वर्षांपासून खरीप हंगामात अज्ञात रोगाचे आक्रमण, व्हायरसचा प्रकोप, बोन्ड अळीचे थैमान घालत असून, शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांना नेमक्या मुख्य पिकांपैकी आता कोणते पीक घ्यावे, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे जिल्हा असलेल्या कृषी विद्यापीठाने नवीन तंत्रज्ञान विकसित करून खरीप हंगामात हमी असलेल्या पिकांची निर्मिती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगाम आहेत. त्यापैकी खरीप हंगाम ही शेतकऱ्यांची बारा महिन्यांची खेप समजली जाते. खरीप हंगामातील मुख्य पिकांमधून येणाऱ्या उत्पादनावर शेतकरी स्वप्ने पूर्ण होण्याची वाट बघतो; मात्र गेल्या काही वर्षांपासून खरीप हंगामातील मुख्य पीक कपाशी शेतकऱ्यांना दगा देत आहे. कपाशीवर बोन्ड अळी, बोंड सळीचे आक्रमण होत असून, पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे लागवडीचा खर्चही वसूल होत नाही. सोयाबीन सुद्धा मुख्य पीक समजले जाते; मात्र या पिकावर खोडकिळा व चक्रीभुंगा दरवर्षी येऊन आक्रमण करीत असून, उत्पादनात घट होत आहे. एकरी दहा क्विंटल होणारे पीक दोन ते तीन क्विंटलवर येऊन ठेपले आहे.
---------------------
उडीद, मुगाच्या उत्पादनात प्रचंड घट
शेतकरी नगदी पीक म्हणून मूग, उडीद पिके घेतात. या पिकांवर बेडका रोग, व्हायरसचे आक्रमण होत आहे. तूर या पिकावर मररोग, अळींचे आक्रमण बघता, याविषयी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी लढा देत आहे. निसर्गाची साथ नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच विविध रोगांचे आक्रमणही वाढल्याने उत्पादनात प्रचंड घट निर्माण होत आहे. कृषी विभाग किंवा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना हमी देणारे वाण विकसित करण्याची मागणी होत आहे.
------------------
कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षी मी शेतातील पिकांवर फवारणी किंवा पीक लागवड करीत आहे, परंतु तरीही पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ होत नसल्याने लागवडीचा खर्चही वसूल होत नाही. कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत नसल्याचा हा परिणाम आहे.
- प्रमोद गावंडे, शेतकरी, तेल्हारा.
-------------------------
कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील.
- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा