पावसामुळे पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:45 AM2017-10-12T01:45:20+5:302017-10-12T01:46:25+5:30
पातूर : पातूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून पडलेल्या पावसाने सोयाबीन पिकाला पुन्हा नुकसान पोहोचले. पर्यायाने सोयाबीन उत्पादनात पुन्हा घट होणार आहे; मात्र याचवेळी या पावसाने काही प्रमाणात कापूस व तूर या पिकाला फायदा होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर : पातूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून पडलेल्या पावसाने सोयाबीन पिकाला पुन्हा नुकसान पोहोचले. पर्यायाने सोयाबीन उत्पादनात पुन्हा घट होणार आहे; मात्र याचवेळी या पावसाने काही प्रमाणात कापूस व तूर या पिकाला फायदा होणार आहे.
यावर्षी खरीप हंगामात पडलेल्या अल्प पावसाने सोयाबीनच्या उत्पादनावर आधीच परिणाम झाला. ज्या शेतकर्यांनी सोयाबीनची काढणी केली, त्यांना एकरी एक क्विंटलपासून तर अडीच क्विंटल याप्रमाणे झडती लागली. त्यामुळे शेतकर्यांनी सोयाबीनला लावलेला मशागतीपासून तर काढणीपर्यंत केलेला खर्चसुद्धा भरून निघाला नाही. त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. अजून ६0 ते ७0 टक्के शेतकर्यांचे सोयाबीन काढणे बाकी आहे. काहींनी सोंगून ठेवले, तर काहींच्या शेतात गंजी मारून झाकून ठेवले आहे.
काहींच्या शेतात सोयाबीनचे उभेच आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतात उभे असलेल्या व परिपक्व झालेल्या सोयाबीनच्या दाण्याला काही ठिकाणी कोम फुटले आहे. त्यामुळे सोयाबीनच्या प्रतवारीत फरक पडणार आहे.
शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळत नाही. त्यातच पूर्वीच्या अल्प पावसाने व काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सोयाबीनच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला. उत्पादनात प्रचंड घट आल्याने पुन्हा शेतकर्याला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
कपाशी, तुरीला लाभ होण्याची शक्यता
नवरात्रदरम्यान तापलेल्या उन्हाने जमिनीतील पाण्याचा ओलावा कमी होऊन जमीन कडक झाली होती. त्यामुळे सोयाबीनसोबत कपाशी व तुरीचे पीक सुकू लागले होते; परंतु या पावसाने जमिनीत ओलावा निर्माण झाला. त्यामुळे सध्या आलेल्या पावसामुळे कपाशी व तुरीच्या पिकाला या पावसाचा फायदा झाला आहे.
-