पीक नुकसानाचे होणार सर्वेक्षण!
By admin | Published: October 23, 2016 02:20 AM2016-10-23T02:20:59+5:302016-10-23T02:20:59+5:30
अकोला जिल्हाधिकार्यांचा महसूल, कृषी यंत्रणेला आदेश
अकोला, दि. २२- परतीच्या पावसामुळे जिल्हय़ात झालेल्या पीक नुकसानाचे सर्वेक्षण करून अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हय़ातील तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) व तालुका कृषी अधिकार्यांना शुक्रवारी दिला.
गत ४ ऑक्टोबरपर्यंत जिल्हय़ात परतीचा पाऊस जोरदार बरसला. या पावसामुळे काढणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तसेच उडीद व कापूस पिकाचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने, गत दोन वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीनंतर जिल्हय़ातील शेतकरी पुन्हा हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर यावर्षीच्या खरीप हंगामात गत जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत अतवृष्टी, वादळी वारे व पुरामुळे शेती पिके व फळपिकांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे कृषी आयुक्तालयाच्या कृषी संचालक (विस्तार शिक्षण)मार्फत १९ ऑक्टोबर रोजीच्या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानुषंगाने गत जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्हय़ातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद या पिकांच्या नुकसानासह खरबडून गेलेल्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करून संयुक्त स्वाक्षरीचे अहवाल ता तडीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांकडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हय़ातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना दिला.
तालुका स्तरावरील संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तातडीने सादर करण्याचा आदेशही जिल्हाधिकार्यांनी दिला आहे. त्यानुसार जिल्हय़ातील पीक नुकसानाचे सर्वेक्षण लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
संयुक्त पथकांद्वारे होणार सर्वेक्षण!
जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार जिल्हय़ातील पीक नुकसानाचे सर्वेक्षण कृषी सहायक, ग्रामसेवक व तलाठय़ांचा समावेश असलेल्या संयुक्त पथकांद्वारे करण्यात येणार आहे.
शेतकर्यांना मदतीची प्रतीक्षा!
परतीच्या पावसामुळे जिल्हय़ात सोयाबीन, उडीद व कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, पीक नुकसानाचे सर्वेक्षण आणि शासनामार्फत पीक नुकसानभरपाईपोटी मदत केव्हा मिळणार, याबाबत शेतकर्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.