पिके हातून गेली, पण पैसेवारी ५0 पैशांवर!
By admin | Published: October 3, 2015 02:39 AM2015-10-03T02:39:28+5:302015-10-03T02:39:28+5:30
प्रशासनाचा नजरअंदाज अवास्तव: शेतकरी हवालदिल.
अकोला: अत्यल्प पावसामुळे मूग व उडिदाचे पीक हातून गेले, सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला; मात्र जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या खरीप पिकांच्या नरजअंदाज पैसेवारीत केवळ ५५ गावांची पैसेवारी ५0 पैशापेक्षा कमी असून, जिल्ह्यातील उर्वरित ९४२ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रशासनमार्फत काढण्यात आलेल्या जिल्ह्यातील खरीप पिकांच्या नजरअंदाज अवास्तव पैसेवारीबाबत शेतकर्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला. यावर्षीच्या पावसाळ्यात प्रारंभी पावसाने दांडी मारल्याने खरीप पेरण्या लांबल्या. तसेच अत्यल्प पाऊस झाल्याने, मूग पिकाचे उत्पादन सरासरी एकरी २0 ते २५ किलो झाले असून, उडिदाचे पीक बुडाले. अनेक ठिकाणी मूग व उडीद पिकाची वखरणी करावी लागली. त्यामुळे या पिकांच्या पेरणीसाठी केलेला खर्च भरून काढणारे उत्पादनही मिळाले नसल्याने, जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. सोयाबीन पिकाचे उत्पादन एकरी सरासरी २ ते ३ क्विंटल झाल्याने, या पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. तसेच कपाशी पिकाची स्थितीही वाईट असून, दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशी पिकाच्या उत्पादनात ५0 ते ६0 टक्क्यांची घट होण्याची शक्यता शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे. मूग व उडीद पिकांचे उत्पादन बुडाले असून, सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे. खरीप हंगामातील हातून गेलेली पिके उत्पादनात प्रचंड घट झाली असतानाच, ३0 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकार्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील खरीप पिकांच्या नजर पैसेवारीनुसार मात्र जिल्ह्यातील लागवडीयोग्य एकूण ९९७ गावांपैकी केवळ ५५ गावांमधील खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैशापेक्षा कमी असून, उर्वरित ९४२ गावांमधील खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा जास्त आहे. हातून गेलेली पिके आणि पिकांच्या उत्पादनात झालेली प्रचंड घट बघता, जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या खरीप पिकांच्या नरजअंदाज पैसेवारीवर शेतकर्यांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.