पीक विम्याच्या फरकाची रक्कम अखेर ३८० शेतकऱ्यांच्या खात्यात जमा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:18 AM2021-02-13T04:18:48+5:302021-02-13T04:18:48+5:30
अकोला: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत आनलाईन पीक विमा काढल्यानंतर पीक विमा फरकाच्या रकमेपासून गेल्या दोन वर्षांपासून वंचित असलेल्या अकोला ...
अकोला: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत आनलाईन पीक विमा काढल्यानंतर पीक विमा फरकाच्या रकमेपासून गेल्या दोन वर्षांपासून वंचित असलेल्या अकोला तालुक्यातील कौलखेड जहाॅगीर येथील ३८० शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात अखेर पीक विम्याच्या फरकापोटी ९५ लाख ६९ हजार ७०० रुपयांची रक्कम ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीमार्फत ११ फेब्रुवारी रोजी जमा करण्यात आली. त्यामुळे यासंदर्भात आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांनी शासनासह संबंधित यंत्रणांकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, पीक विम्याच्या फरकाची प्रलंबित रक्कम खात्यात जमा झाल्याने, शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०१९ मधील खरीप हंगामात अकोला तालुक्यातील पळसो महसूल मंडळ अंतर्गत कौलखेड जहाॅगीर येथील ऑनलाईन पीक विमा काढलेल्या ३८० शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी प्रती हेक्टर २३ हजार ७०० रुपयेप्रमाणे पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली. परंतू मंजूर पीक विमा रकमेच्या तुलनेत विमा कंपनीकडून प्रती हेक्टर १४ हजार ४०० रुपये प्रमाणे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली होती. शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ९ हजार ३०० रुपयेप्रमाणे पीक विम्याची रक्कम कमी देण्यात आल्याने, पीक विमा रकमेच्या फरकाची ९५ लाख ६९ हजार ७०० रुपयांची रक्कम प्रलंबित होती. पीक विम्याच्या फरकाची रक्कम संबंधित विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली नसल्याने, पीक विम्याच्या फरकाची रक्कम कौलखेड जहाॅगीर येथील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी आ.रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला होता. परंतू पीक विमा फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली नसल्याने, यासंदर्भात ॲग्रीकल्चर इश्युरन्स कंपनीविरुध्द गुन्हा दाखल करुन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा तसेच पीक विमा फरकाच्या रकमेपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी आ. सावरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली होती. तसेच यासंदर्भात कृषी आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठांकडे केली होती. अखेर संबंधित विमा कंपनीकडून कौलखेड जहाॅगीर येथील ३८० शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा फरकाची ९५ लाख ६९ हजार ७०० रुपयांची रक्कम ११ फेब्रुवारी रोजी जमा करण्यात आली. त्यामुळे यासंदर्भात आ. रणधीर सावरकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून, पीक विमा फरकाच्या रकमेपासून वंचित असलेल्या कौलखेड जहाॅगीर येथील शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.