महिनाभरात पीक कर्ज वाटप २०० कोटींवर!
By Admin | Published: May 3, 2017 01:17 AM2017-05-03T01:17:03+5:302017-05-03T01:17:03+5:30
कर्ज वाटपाच्या उद्दिष्टपूर्तीवर प्रश्नचिन्ह
अकोला : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १ हजार २०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असले, तरी गत महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ २०४ कोटी ५० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्यास महिनाभराचा कालावधी उरला असताना, उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत वाटप करण्यात आलेल्या पीक कर्जाचे प्रमाण बघता, खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पावसाळा तोंडावर आल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून, खरीप पेरणीची तयारी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. पेरणीसाठी लागणारी बियाणे आणि खतांचा खर्च पीक कर्जातून भागविण्याचे नियोजन शेतकऱ्यांकडून केले जात आहे. त्यानुषंगाने पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. या पृष्ठभूमीवर सन २०१७-१८ या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार २०० कोटी रुपयांचे पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक आणि खासगी बँकांमार्फत गत १ एप्रिलपासून पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले. महिनाभराच्या कालावधीत २७ एप्रिलपर्यंत उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ २०४ कोटी ५० लाख ४६ हजार रुपये पीक कर्जाचे वाटप बँकांमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करण्यात आले. पावसाळा सुरू होण्यास महिनाभराचा कालावधी उरला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी पीक कर्जाचा लाभ मिळणार की नाही आणि खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बँकांकडून असे करण्यात आले कर्ज वाटप!
गत महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात बँकांमार्फत २०४ कोटी ५० लाख ४६ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक १९३ कोटी ७२ लाख रुपये, राष्ट्रीयीकृत बँका ३ कोटी २० लाख रुपये, ग्रामीण बँक ३ कोटी ८६ लाख आणि खासगी बँकांमार्फत ३ कोटी ७२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.