पीक कर्जाचे आजपासून सुरू होणार वाटप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 09:46 AM2020-04-20T09:46:16+5:302020-04-20T09:46:32+5:30
पीक कर्जाचे वाटप सोमवार, २० एप्रिलपासून सुरू होत आहे.
अकोला : यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपासाठी जिल्ह्यातील १ लाख २५ हजार शेतकरी पात्र ठरले असून, पीक कर्जाचे वाटप सोमवार, २० एप्रिलपासून सुरू होत आहे.
खरीप हंगामातील पीक कर्जाचे वाटप १ एप्रिलपासून सुरू होत असते; परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत देशभरात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले असून, राज्यभरात गत २४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया रखडली आहे.
गतवर्षीच्या खरीप हंगामात घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करणारे आणि कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले असे जिल्ह्यात एकूण १ लाख २५ हजार शेतकरी यावर्षीच्या खरीप हंगामात पीक कर्जासाठी पात्र ठरले आहेत; परंतु पीक कर्जाचे वाटप अद्याप सुरू करण्यात आले नसल्याने, कर्जाचे वाटप केव्हा सुरू होणार, याबाबत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात असताना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत २० एप्रिलपासून जिल्ह्यातील पात्र शेतकºयांना कर्जाचे वाटप सुरू करण्यात येत आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील पात्र शेतकºयांना कर्जाचे वाटप २० एप्रिलपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सुरू करण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी पीक कर्जाकरिता शेतकºयांनी बँकांमध्ये गर्दी करू नये आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखावे.
- अनंत वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला.