खरीप पेरणीच्या तोंडावर पीक कर्ज 'लॉकडाऊन'!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:16 AM2021-05-17T04:16:49+5:302021-05-17T04:16:49+5:30

अनंत वानखडे बाळापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामध्ये बॅंकेचे व्यवहार सकाळी ...

Crop loan 'lockdown' in the face of kharif sowing! | खरीप पेरणीच्या तोंडावर पीक कर्ज 'लॉकडाऊन'!

खरीप पेरणीच्या तोंडावर पीक कर्ज 'लॉकडाऊन'!

Next

अनंत वानखडे

बाळापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामध्ये बॅंकेचे व्यवहार सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत केवळ दोनच तास सुरू असणार आहेत. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी पैशांची जुळवाजुळव करीत असून, पीक कर्जासाठी बँकेत चकरा मारीत आहेत. अशातच बॅंकेची वेळ दोनच तास असल्यामुळे व्यवहारास अडचणी येत आहेत. ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर पीक कर्जही लॉकडाऊन झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. तसेच दररोज व्यवहार करणारे व्यावसायिकही अडचणीत सापडले आहेत.

जिल्ह्यातील वाढता कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी दि. १ जूनपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यात अनेक बंधने घालण्यात आली असून, बॅंकेच्या व्यवहारांना के‌वळ दोनच तास सूट मिळाली आहे. दरम्यान, सर्वसामान्य, नोकरदार व इतर व्यावसायिक या दोनच तासांमध्ये व्यवहार करणार असल्याने शेतकऱ्यांची फरपट होत आहे. शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीचे नियोजन सुरू केले असून, पीक कर्ज घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, बँकांकडून पीक कर्ज वाटपसंदर्भात कोणत्याही प्रकारची तयारी दिसून येत नसल्याचे चित्र आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा सर्वांत मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यात दुष्काळाने शेतकऱ्यांचे अर्थचक्र थांबविले आहे.

----------------------------------

महागाई वाढल्याने शेतकरी अडचणीत!

बी-बियाणे, रासायनिक खते, शेतीपयोगी साहित्य, साधनांची किमती वाढत्या महागाईमुळे गगनाला भिडल्या आहेत. दुष्काळ असतानासुद्धा शासनाने दुर्लक्ष करीत आर्थिक मदतीचा दिलासा दिला नसल्याने शेतकऱ्यांना कर्ज काढून शेतीला खर्च लावावा लागणार आहे. मात्र, पीक कर्जाचे नियोजन दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांवर खासगी सावकारांचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे.

------------------------------------

पीक कर्ज प्रक्रियेची गती वाढवा!

शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचण सोडविण्यासाठी बँकांनी पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू करून गती देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना अवाजवी कागदपत्रांची मागणी करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

-------------------

खरीप हंगाम तोंडावर असल्याने पीक कर्जासाठी धावपळ सुरू आहे. अशातच बॅंकेचे व्यवहार केवळ दोनच तास सुरू आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन पीक कर्जासाठी वेगळी व्यवस्था करून शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज द्यावे.

- लक्ष्मण चोपडे, शेळद, शेतकरी.

Web Title: Crop loan 'lockdown' in the face of kharif sowing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.