पीक पद्धतीत आता बदल गरजेचा - कुलगुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 02:47 PM2019-05-25T14:47:56+5:302019-05-25T14:48:05+5:30
बाजारपेठेची मागणी बघून जे विकते तेच शेतकऱ्यांनी पेरावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी शुक्रवारी केले.
अकोला: शाश्वत शेती विकासासाठी आता पीक पद्धतीत बदल करावा लागणार असून, शेती एक मोठे रोजगार निर्मितीचे साधन असल्याने प्रक्रिया उद्योग उभारतानाच बाजारपेठेची मागणी बघून जे विकते तेच शेतकऱ्यांनी पेरावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी शुक्रवारी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने कृषी विद्यापीठाच्या डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय खरीप पूर्व कृषी मेळाव्यात डॉ. भाले बोलत होते. मंचावर कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.व्ही.के. खर्चे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. महेंद्र नागदेवे, अधिष्ठाता उद्यानविद्या शास्त्र डॉ. प्रकाश नागरे, प्रगतिशील शेतकरी आप्पा गुंजकर, विजय इंगळे यांची उपस्थिती होती.
डॉ. भाले यांनी कपाशी, सोयाबीनऐवजी आता हवामानाच्या बदलानुसार पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे असल्याचे सांगितले. कापूस घेतला तर त्यामध्ये आतंरपीक घ्यावे, यामध्ये भाजीपाला पिकेही घेता येतात. ज्वारी हे उत्तम पीक असून, कृषी विद्यापीठाने ज्वारीच्या भरघोस पीक देणाºया जाती विकसित केल्या आहेत. ज्वारी पेरणी केल्यास मूल्यवर्धन होईल व गुरांच्या वैरणाचा प्रश्न निकाली काढता येईल. तसेच तेलबिया पिकांमध्ये करडई, सूर्यफूल, भुईमूग आदी पिके घेता येतील. मूग, उडीद, तूर ही पिके घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले. शेती रोजगाराचे मोठे साधन असल्याने कृषी प्रक्रिया उद्योगांची गरज आहे. यासाठीच शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. शेतकरी, बेरोजगार कुशल, कौशल्य प्राप्त व्हावा म्हणून या प्रशिक्षणासाठी शासनाने कृषी विद्यापीठाला भरीव १३ कोटीचा निधी उपलब्ध केला. रोजगार निर्मितीसाठी कृषी विद्यापीठाने शेतकरी, बेरोजगारांना ट्रायकोकार्ड निर्मिती करण्यासाठीचे तंत्रज्ञान उपलब्ध करू न दिले.
या खरीप हंगामासाठी पीकेव्ही-२ हायब्रीड बीजी-२ तसेच जेके एल बियाणे उपलब्ध करू न दिले आहे. सोयाबीन व इतर सर्वच कृषी विद्यापीठ निर्मित विविध पिकांचे बी बियाणे व इतर कृषी निविष्ठाची खरेदी शेतकऱ्यांनी केली. यामध्ये उडीद, तूर, मूग, सोयबीन, भाजीपाला बियाणे मिळून जवळपास ४३ क्विंटल बियाणे विक्री झाली. १५ हजार रुपयांचे जैविक निविष्ठा, ५ हजार रुपयांचे औषधी तथा सुगंधी वनस्पती बियाणे विक्री झाली. मेळाव्याला विदर्भातील शेतकºयांची उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे यांनी केले. आभार विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी मानले. याप्रसंगी महाबीजद्वारेसुद्धा मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून देण्यात आले. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर यांच्या मार्गदर्शनात मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. नारायण काळे, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे, प्रमुख संपादक संजीवकुमार सलामे, विस्तार प्रशिक्षण अधिकारी डॉ. कैलास लहरिया यांच्यासह अर्चना चव्हाण, मकरंद शिंदे, ओमकार सोनकर, नरेश डोंगरे, विष्णू तावरे, श्रीकांत दामोदर व प्रशिष चक्रनारायण यांनी परिश्रम घेतले.
भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्लीद्वारा प्रयोगशील शेतकरी २०१९ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शेतकरी प्रतिनिधी चितलवाडी ता. अकोट येथील विजय इंगळे, टाकरखेड ता. चिखली. जि. बुलडाणा येथील पंढरी गुजकर यांच्यासह विस्तार शिक्षण संचालनालयाचे मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. नारायण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याचे प्रास्ताविक डॉ. नारायण काळे यांनी केले. कृषी विद्यापीठावर निष्ठा अधिक दृढ करीत संपर्क वाढवत फायद्याची शेती करावी, असे आवाहन शेतकरी प्रतिनिधी चितलवाडी ता. अकोट येथील विजय इंगळे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. याप्रसंगी कपाशीवरील गुलाबी बोंडअळी आणि रस शोषण करणाºया किडींचे नियोजन या विषयावर डॉ. ए. व्ही. कोल्हे यांनी सविस्तर माहिती देत शेतकºयांच्या शंकांचे समाधान केले. सोयाबीनवरील कीड व रोग नियंत्रण यावर डॉ. चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. शेतकºयांच्या प्रश्नांना सभागृहात उपस्थित शास्त्रज्ञांनी समर्पक उत्तरे देत शंकांचे समाधान केले. विद्यापीठ आम्हाला सर्वार्थाने मार्गदर्शक असून, येथून प्राप्त ज्ञानाच्या भरवशावर आम्ही राष्ट्रीय पातळीवर आपल्या भागांचे प्रतिनिधित्व करू शकल्याचे समाधान पंढरी गुजकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
-मान्सून लांबला
यावर्षी सहा दिवस मान्सून लांबला असला तरी शेतकºयांनी घाबरण्याचे कारण नाही. सहा जूननंतर पुन्हा मान्सून सक्रिय होईल, असे भाकीत हवामानशास्त्र विभागाने केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.