पिकांचे उत्पादन बुडाले; खर्चही निघाला नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 02:11 AM2017-10-04T02:11:26+5:302017-10-04T02:12:26+5:30
अकोला : कमी पावसामुळे जिल्हय़ात एकही खरीप पिकाचे उत्पादन शेतकर्यांच्या हातात राहिले नाही. पिकांचे उत्पादन बुडाल्याने, लागवडीवर केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याची परिस्थिती असल्याने, जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेली खरीप पिकांची जिल्हय़ातील नजरअंदाज सरासरी पैसेवारी चुकीची आणि अवास्तव आहे, अशा प्रतिक्रिया जिल्हय़ातील शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कमी पावसामुळे जिल्हय़ात एकही खरीप पिकाचे उत्पादन शेतकर्यांच्या हातात राहिले नाही. पिकांचे उत्पादन बुडाल्याने, लागवडीवर केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याची परिस्थिती असल्याने, जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेली खरीप पिकांची जिल्हय़ातील नजरअंदाज सरासरी पैसेवारी चुकीची आणि अवास्तव आहे, अशा प्रतिक्रिया जिल्हय़ातील शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्हय़ात कमी पाऊस झाल्याने मूग, उडिदाचे पीक हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात ८0 टक्के घट झाली असून, ‘लाल्या’सारख्या किडीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाच्या उत्पादनाचेही काही खरे नाही. त्यामुळे एकही खरीप पिकाचे उत्पादन शेतकर्यांच्या हातात आले नसून, पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप पिकांच्या लागवडीसाठी केलेल्या खर्चाच्या तुलनेत उत्पादन झाले नसल्याने, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघाला नसल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. नापिकीमुळे जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याच्या परिस्थितीत जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी २९ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिल्हय़ातील लागवडीयोग्य ९९0 गावांमधील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी ६१ पैसे आहे. खरीप पिकांचे बुडालेले उत्पादन, पिकांच्या लागवडीवर करण्यात आलेला खर्चही वसूल झाला नसल्याने, नापिकीचे वास्तव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेली जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी चुकीची असून, अवास्तव आहे, अशा प्रतिक्रिया जिल्हय़ातील शेतकर्यांसह शेतकरी नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
उडीद लागवडीवर खर्च ६0 हजार; उत्पन्न मिळाले १५ हजार!
सात एकर उडीद पिकाच्या लागवडीवर ६0 हजार रुपये खर्च केला. त्या तुलनेत पिकाच्या उत्पादनातून १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे उडीद पिकाच्या लागवडीवर केलेल्या खर्चाची रक्कमही वसूल झाली नाही, अशी व्यथा तुलंगा येथील शेतकरी समाधान सदार यांनी व्यक्त केली.
कमी पावसामुळे जिल्हय़ात मूग, उडीद पिकाचे उत्पादन बुडाले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही कमालीची घट झाली. खरिपातील कोणत्याही पिकाचे उत्पादन शेतकर्यांच्या हातात येण्याची शक्यता नसल्याने, जिल्हय़ात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पीक परिस्थितीचे वास्तव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी चुकीची आणि अवास्तव आहे.
-प्रदीप देशमुख, विदर्भ विभागीय चिटणीस, शेतकरी कामगार पक्ष.
मूग, उडीद पिकांचे उत्पादन झाले नाही. सोयाबीन पिकाचे ८0 टक्के उत्पादन बुडाले. कपाशी पिकाच्या उत्पादनाचेही खरे नाही. त्यामुळे खरीप हंगामातील एकही पीक शेतकर्यांच्या हातात राहिले नाही. नापिकीमुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याने, शेतकरी संकटात सापडल्याची परिस्थिती असताना जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेली जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी पूर्णत: अयोग्य आणि अवास्तव आहे.
-प्रशांत गावंडे, जिल्हा समन्वयक, शेतकरी जागर मंच.