पारद परिसरात १०० एकरावरील पिके पाण्याखाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:18 AM2021-07-26T04:18:58+5:302021-07-26T04:18:58+5:30
मूर्तिजापूर : तालुक्यातील पारद परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने ...
मूर्तिजापूर : तालुक्यातील पारद परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतशिवारातील तब्बल १०० एकरावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी सरपंच विनोद मानकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसाचा फटका तालुक्यातील पारद परिसरात सांगवा मेळ, भटोरी आणि पारद येथील शेतकऱ्यांना बसला आहे. खेकडी नाल्याला आलेल्या पुरामुळे तब्बल शंभर एकर क्षेत्रावर पाणीच पाणी साचले आहे. याशिवाय, पूर्णा नदीकाठजवळील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे परिसरात महसूल विभागाने सर्व्हे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पंचनामे न झाल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. (फोटो)
-------------------------------
पंचनामे करून मदत द्या; अन्यथा आंदोलन
मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या भागात सर्व्हे करण्याचा आदेश महसूल प्रशासनाने त्वरित द्यावा, तसेच शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी पारद येथील सरपंच विनोद मानकर, सामाजिक कार्यकर्ते नाजूकराव खंडारे, ग्रा.पं. सदस्यांसह शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत दुर्लक्ष केल्यास शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
-----------------------
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
मूर्तिजापूर तालुक्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. पावसामुळे पिके पाण्याखाली गेली असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकात पाणी साचल्याने पिके पिवळी पडून उत्पादन घटणार असल्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. काही शेतकऱ्यांची पिकांसह शेतजमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.