पिके पडू लागली पिवळी; शेतकरी चिंतेत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:20 PM2019-09-18T12:20:18+5:302019-09-18T12:20:33+5:30
पिकांच्या लागवडीवर केलेला खर्च वसूल होणार की नाही, याबाबत शेतकरी चिंतेत सापडला आहे.
- संतोष येलकर
अकोला : गेल्या दीड महिन्यांपासून सतत ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यात खरीप पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे पिकांचे उत्पादन घटणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्च वसूल होणार की नाही, याबाबत शेतकरी चिंतेत सापडला आहे.
गतवर्षी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने, शेतकरी संकटात सापडला होता. यावर्षीच्या खरीप हंगामात पिकांचे समाधानकारक उत्पादन होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून करण्यात आली; मात्र यावर्षीच्या पावसाळ्यात पाऊस सुरू होण्यास विलंब झाल्याने, जिल्ह्यातील बहुतांश भागात मूग व उडीद पिकाचे उत्पादन बुडाले. विलंबाने सुरू झालेल्या रिमझिम पावसात कपाशी, सोयाबीन, तूर व इतर पिकांच्या पेरण्या उरकल्यानंतर पावसात खंड पडला होता. त्यानंतर गत २६ जुलैपासून जिल्ह्यात पाऊस सुरू झाला. सतत ढगाळ वातावरण आणि कधी रिमझिम तर कधी जोरदार पाऊस बरसत असल्याने, जिल्ह्यात कपाशी, तूर व सोयाबीन इत्यादी पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही वसूल होणार की नाही, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
तण वाढले; निंदन, डवरणी थांबली !
पाऊस सतत हजेरी लावत असल्याने पिकांमध्ये तण प्रचंड वाढले आहे. पाऊस सुरू असल्याने निंदन, वखरणी, डवरणी इत्यादी कामे थांबली आहेत. त्यामुळे पिकांमध्ये तण (गवत ) वाढत असल्याने, पिके धोक्यात आली आहेत.
कीड-रोगांचा प्रादुर्भाव; फुलोर-शेंगा गळू लागल्या!
सतत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे कपाशी, तूर व सोयाबीन या पिकांवर मावा, बोंडअळी, पांढरी माशी, लष्करी अळी इत्यादी कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे . कीड व रोगांच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचा फुलोर आणि शेंगा गळू लागल्या आहेत. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
लागवडीचा खर्च वाढला!
ढगाळ वातावरण आणि सुरू असलेल्या पावसामुळे पिकांमध्ये तण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने, निंदण, डवरणी व वखरणी तसेच पिकांवरील कीड व रोगांच्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कीटकनाशकाची फवारणी इत्यादी पीक लागवडीचा खर्च वाढला आहे. लागवडीचा खर्च वाढला असला तरी, पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने, लागवडीचा खर्च निघणार की नाही, असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.
सतत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे पिके पिवळी पडू लागली आहेत, तसेच पिकांवर मावा, बोंडअळी, पांढरी माशी अशा कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पिकांमध्ये तण (गवत) मोठ्या प्रमाणात वाढले असून, पावसामुळे निंदण, डवरणी, वखरणी अशी कामे थांबली आहेत. त्यामुळे पिकांचे उत्पादन घटणार असून, लागवडीचा खर्चही वसूल होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने पिकांचा सर्व्हे करून, शेतकºयांना मदत मिळाली पाहिजे.
-मनोज तायडे
शेतकरी, कौलखेड जहागीर.
ढगाळ वातावरण व सतत पाऊस सुरू असल्याने कपाशी, तूर, सोयाबीन इत्यादी पिके पिवळी पडू लागली आहेत. कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीनचा फुलोर व शेंगा गळून पडत आहेत. पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. पिकांच्या लागवडीचा खर्च वाढला; मात्र लागवडीवर केलेला खर्च निघणार की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे पिकांचा सर्व्हे करून, शेतकºयांना मदत देण्यासंदर्भात उपाययोजना झाली पाहिजे.
-शिवाजीराव भरणे
शेतकरी, रामगाव.