विजेअभावी पाणी देता येत नसल्याने पीक धोक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:17 AM2021-03-18T04:17:46+5:302021-03-18T04:17:46+5:30
शिर्ला: वीजबिल थकीत असणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणकडून सुरू आहे. महावितरणच्या धडक कारवाईमुळे नागरिक धास्तावले असून, शेतकरी ...
शिर्ला: वीजबिल थकीत असणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणकडून सुरू आहे. महावितरणच्या धडक कारवाईमुळे नागरिक धास्तावले असून, शेतकरी चिंतेत सापडले आहेत. शिर्ला परिसरात शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने परिसरातील रब्बी हंगाम व उन्हाळी पिके धोक्यात सापडली आहेत.
वीजबिल थकीत असलेल्या कृषिपंप व घरगुती कनेक्शनधारकांचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत राज्य सरकारच्या सक्तीच्या आदेशावरून महावितरण विभागाने कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
गतवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांचा लागवडखर्चही वसूल झाला नाही. सुरुवातीला मूग, उडीदावर अज्ञात विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक गेले. त्यानंतर सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे सोयाबीन पीक काढताना शेतकऱ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. तसेच कपाशीवर बोंडसळ व बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने उभे पीक नांगरण्याची वेळ आली होती. शेतकरी आर्थिक संकटात असताना मोठ्या हिमतीने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी केली. उन्हाळी पिके घेण्याची तयारी केली. सध्या पिके शेतात बहरली असताना विजेअभावी पाणी देता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
---------------------------------------
२०० हेक्टरवरील पिके धोक्यात
तालुक्यातील शिर्ला, भंडारज, भंडारज खु. आगिखेड, आस्टूल, पास्टूल, देऊळगाव आदी गावातील जवळपास २०० हेक्टरवरील पिके धोक्यात सापडली आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
---------------------------------
पैशांची जुळवाजुळव करून उन्हाळी पिकांची पेरणी केली. मात्र, विजेअभावी पाणी देता येत नसल्याने उत्पादनात घट होणार आहे.
संदीप इंगळे, शेतकरी, शिर्ला
वीजबिल थकीत असलेल्या वीज जोडणीधारकांचा विद्युत पुरवठा शासनाच्या आदेशानुसार खंडित करण्याची कारवाई सुरू आहे.
- आर. एम. सरनाईक, कनिष्ठ अभियंता, वीज उपकेंद्र, पातूर.