अकोला तालुक्यात पिके बहरली; ५२ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:24 AM2021-08-19T04:24:19+5:302021-08-19T04:24:19+5:30
रवी दामोदर अकोला: यंदा अकोला तालुक्यात खरीप हंगामात एक लाख ९ हजार ८१४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सद्यस्थितीत ...
रवी दामोदर
अकोला: यंदा अकोला तालुक्यात खरीप हंगामात एक लाख ९ हजार ८१४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सद्यस्थितीत शेतात पिके डोलू लागली असून, आंतर मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला पसंती दिली असून, तालुक्यात ५२ हजार ९९८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. तालुक्यात मंगळवार, बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.
तालुक्यात जुलै अखेर तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने, खरप बु., घुसर, म्हातोडी, आपातापा, दोनवाडा, सांगळूदसह सर्वच गावांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात शेतात पाणी साचल्याने पिके संकटात सापडली असून, तालुक्यातील आगर, लोणाग्रा परिसरात पिकांची वाढ खुंटल्याचे चित्र आहे. शेतकरी आंतर मशागतीच्या कामांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र आहे. गत २० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मंगळवारी पावसाने हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली असून, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातारण निर्माण झाले आहे. परिसरत निंदण, खुरपणी, डवरणी व फवारणीच्या कामांना वेग आला आहे.
तालुक्यात पंचनाम्याची कामे सुरू असून, शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.
--------------
शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
तालुक्यात २१ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसाने शेत जमिनीचे व पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात पंचनामे झाले असून, शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. तालुक्यातील आपातापा, घुसर परिसरात राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनीही पाहणी केली आहे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
----------------------------
अकोला तालुक्यात खरीप हंगामातील पीक पेरणी (हेक्टर)
कापूस ३८,७६० हेक्टर
सोयाबीन ५२,९९८ हेक्टर
तूर ८,५७८
मूग ३,९४६
उडीद २,६४६.८०
ज्वारी २,४०५
इतर ४८०.९०
एकूण: १,०९८१४.७०
----------------------------
तालुक्यात पिके चांगली आहेत. शेतकरी फवारणीच्या कामात व्यस्त आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
- डी.एस. प्रधान, तालुका कृषी अधिकारी, अकोला.