६ हजार २७४ हेक्टरवरील पिके मातीमोल, अवकाळीचा तडाखा
By रवी दामोदर | Published: April 11, 2023 02:55 PM2023-04-11T14:55:14+5:302023-04-11T14:55:27+5:30
घास हिरावला, शेतकरी हतबल
रवी दामोदर, अकोला: जिल्ह्यात तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात तीन दिवसांत ६ हजार २७४ हेक्टर क्षेत्रावरील गहू, कांदा, टरबूज, पपई, भाजीपाला व लिंबू या पिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील काही भागांत सलग तीन दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे परिश्रमाने फुलविलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शुक्रवार दुपारपासून जिल्हाभरातील आसमंतात ढगांचा मंडप तयार होऊन ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. शुक्रवार, शनिवार या दोन दिवसांत अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ५ हजार ८५९.०७ हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. पुन्हा रविवारी तिसऱ्या दिवशीही रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तब्बल ४१५ हेक्टरवरील पीक मातीमोल झाले आहे. रविवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटाने सर्वांची दाणादाण उडविली होती. या वादळी वाऱ्यामुळे अंशत: ७ घरांचे नुकसान झाले आहे.
कृषिमंत्र्यांकडून जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी
जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पातूर व बाळापूर तालुक्यातील बेलुरा खुर्द व वाडेगाव येथे पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी कृषिमंत्री सत्तार यांनी संवाद साधला. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. या वेळी विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी, तहसीलदार सय्यद ऐसामुद्दीन, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक आदी उपस्थित होते.
प्राथमिक अहवालानुसार असे झाले नुकसान
तालुका शेती नुकसान क्षेत्र (हे.)
- पातूर ३११५.९७
- बाळापूर १७०६
- बार्शी टाकळी ३००
- अकोला १०८८
- मूर्तिजापूर ६४.१०
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात ५ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोमवारी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली असून, नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. -किसन मुळे, विभागीय कृषी सहसंचालक