जितापूर नाकट, उमई शिवारात पिके पाण्याखाली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:19 AM2021-07-28T04:19:51+5:302021-07-28T04:19:51+5:30
मूर्तिजापूर: तालुक्यातील जितापूर नाकट, उमई शिवारात गत आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी ...
मूर्तिजापूर: तालुक्यातील जितापूर नाकट, उमई शिवारात गत आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडले आहेत. परिसरातील पिके पाण्याखाली गेले असून, दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
तालुक्यातील जितापूर नाकट, उमई परिसरातील शेतात नाल्याचे पाणी शिरल्याने नाल्याकाठी असलेली शेतजमीन खरडून गेली आहे. तसेच पिकांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी कापूस, तूर, सोयाबीन, उडीद पिकाची पेरणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने या भागात पिकांचे नुकसान झाले असून, याकडे प्रशासनाने लक्ष देऊन पंचनामे करावे, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (फोटो)
------------------------
जितापूर नाकट परिसरातील मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात नाल्याचे पाणी शिरल्याने पिके पाण्याखाली गेले आहेत. तसेच शेतजमीन खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. या भागात सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी.
-गजानन नाकट, शेतकरी, जितापूर नाकट.
-------------------------
रंभापूर शेतशिवारातील सर्व्हे करण्याची मागणी
रंभापूर: अकोट तालुक्यातील रंभापूर शिवारात गेल्या आठवड्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे नदी नाल्या-तीरावरील शेतजमिनीतील पिकांचे भरपूर नुकसान झाले आहे. बोर्डी नदी आणि रंभापूर काळगव्हाण रस्त्यावरील मोठा नाला या शिवारातून वाहत जातो. पुरामुळे शेतजमीन खरडून गेली आहे. या भागात सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. (फोटो)