अवकाळीने तोंडाशी आलेला घास हिरावला; तूर निजली, कापूस पाण्यात

By रवी दामोदर | Published: November 28, 2023 07:21 PM2023-11-28T19:21:22+5:302023-11-28T19:21:39+5:30

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस : ४,६०८ हेक्टरवरील शेतजमीनीचे नुकसान

Crops were damaged due to unseasonal rains in Akola district | अवकाळीने तोंडाशी आलेला घास हिरावला; तूर निजली, कापूस पाण्यात

अवकाळीने तोंडाशी आलेला घास हिरावला; तूर निजली, कापूस पाण्यात

रवी दामोदर

अकोला : जिल्ह्यात रविवारी रात्री अवकाळी पावसाने धुव्वाधार हजेरी लावली. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना फटका बसला असून, पाऊस रब्बी पिकाला वरदान ठरला आहे. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही सोमवारी रात्रीच्या सुमारास अवकाळीने तडाखा दिल्याने वेचणीला आलेला कापूस पाण्यात भिजला असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. जिल्ह्यात ४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, जिल्ह्यात दि. २६ ते २८ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या अवेळी पावसाने शेतीपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानाबाबत पंचनामे व सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

अवकाळी पावसामुळे भार वाढल्याने तूर पिकाने लोटांगण घेतले आहे. तर रब्बी हंगामातील जेमतेम जमिनीवर डोकावणाऱ्या हरभरा पिकाला अतिरिक्त पाणी झाल्याने हे पीक खुरटले. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचाही अवकाळी पावसाने घात केला. आकस्मिक अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चहूबाजूंनी कोंडी झाली आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर आलेला पाऊस पिकांसाठी संजीवनी ठरल्याचे दिसून येत होते. परंतु, सलग दुसऱ्या दिवशी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे.

गायगाव शिवारात २० मेंढ्या, तर वहाळा येथे गाय दगावली

- सलग दोन दिवस झालेल्या अवेळी पावसाने अंदाजे ४ हजार ६०८ हे. शेतजमीनीचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली. अकोला तालुक्यात ४ हजार ५७६ हे. क्षेत्रावर गहू, हरभरा आदी पिकांचे , तर तेल्हारा तालुक्यात ३२ हे. वर भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

- बाळापूर तालुक्यात गायगाव शिवारात वारोडी बु. (ता. मोताळा, जि. बुलडाणा) येथील इसाराम बिचकुले, तान्हाजी गोरे, सोना गजानन भिसे, श्यामराव बिचकुले आदींच्या मालकीच्या २० मेंढ्या दगावल्या. तर पातूर तालुक्यातील वहाळा येथील सारंगधर मोरे यांच्याकडील एक गाय दगावल्याची माहिती आहे.

Web Title: Crops were damaged due to unseasonal rains in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.