ग्रामपंचायत तपासणीची ‘क्रॉस चेकिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 04:02 PM2019-10-21T16:02:46+5:302019-10-21T16:02:57+5:30
१४ ते २२ नोव्हेंबर दरम्यान दोन विशेष पथकांकडून तपासणी करून तसा अहवाल सादर करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिला आहे.
अकोला : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या अभिलेख्यांची तपासणी केल्यानंतर त्या अद्ययावत अभिलेख्यांची ‘क्रॉस चेकिंग’ करण्याची मोहिम राबवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सातही गटविकास अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या पंचायत समितीमध्ये १४ ते २२ नोव्हेंबर दरम्यान दोन विशेष पथकांकडून तपासणी करून तसा अहवाल सादर करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिला आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या दप्तर तपासणीची विशेष मोहीम ५ आॅक्टोबरपर्यंत राबविण्यात आली. त्यामध्ये ग्रामपंचायतींचे अभिलेखे नमुना १ ते ३३ ची तपासणी करण्यात आली. दप्तर तपासणीत आढळलेल्या त्रुटींची पूर्तता सरपंच आणि सरपंचांकडून ग्रामपंचायत स्तरावर करण्याचेही बजावण्यात आले होते. तसेच ग्रामसभेत ग्रामपंचायतींच्या दप्तराचे वाचन करण्यात आले. ग्रामस्थांना ग्रामपंचायत दप्तराची पाहणी करण्यासाठीही उपलब्ध ठेवण्यात आले. आता या क्रॉस तपासणीसाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना इतर पंचायत समितीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला गटविकास अधिकाºयांना मूर्तिजापूर, तर अकोट-पातूर, तेल्हारा-बार्शीटाकळी, बाळापूर-अकोला, बार्शीटाकळी-अकोट, पातूर-तेल्हारा, मूर्तिजापूर-बाळापूर पंचायत समिती ठरवून देण्यात आली आहे. क्रॉस चेकिंग करण्यासाठी दोन पथके राहणार आहेत. त्यामध्ये क्रमांक एकच्या पथकाचे प्रमुख म्हणून गटविकास अधिकारी आहेत. त्यांच्यासोबत एक विस्तार अधिकारी, सहायक लेखाधिकारी, शाखा अभियंता तसेच पथक क्रमांक दोनमध्ये विस्तार अधिकारी पंचायत, कनिष्ठ लेखाधिकारी, शाखा अभियंता किंवा कनिष्ठ अभियंता याप्रमाणे तीन सदस्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश आहेत. या कालावधीत सर्व ग्रामपंचायतींची तपासणी करावी, दररोज ग्रामविकास अधिकारी सर्कलच्या किमान २ ते ३ ग्रामपंचायतींचा समावेश करण्याचे म्हटले आहे.