पातुरातील लसीकरण केंद्रावर अकोलेकरांची गर्दी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:18 AM2021-05-10T04:18:12+5:302021-05-10T04:18:12+5:30
पातूर तालुक्याचे दररोज लसींचे मर्यादित ५०० डोस मिळत आहेत. तालुक्यातील अनेकजण लसीकरणापासून वंचित असताना अकोलेकर नागरिक मोठ्या प्रमाणात पातूर ...
पातूर तालुक्याचे दररोज लसींचे मर्यादित ५०० डोस मिळत आहेत. तालुक्यातील अनेकजण लसीकरणापासून वंचित असताना अकोलेकर नागरिक मोठ्या प्रमाणात पातूर तालुक्यातील केंद्रांवर लसीकरणाकरीता येत आहेत. यामुळे तालुक्यातील लसीकरणावर मोठी गर्दी होत आहे. शनिवारी लसीकरण केंद्रावर फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. लसीकरण ऑनलाइन पध्दतीने होत असल्याने अकोला शहरातील नागरिक तत्काळ ऑनलाइन बुकिंग करीत आहेत. शिवाय ग्रामीण भागातील अनेकांना ऑनलाइनवर नोंदणी करता येत नाही. तसेच नेटवर्कही मिळत नसल्याने, पातूर तालुक्यातील नागरिक लसीकरणापासून वंचित राहात आहेत. वास्तविक पाहता दररोज ठरावीक डोस पातूर तालुक्यातील नागरिकांकरिता देण्याचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांनी केले असताना, अकोल्यातील नागरिक पातुरात येऊन लसीकरण करीत असतील तर तालुक्यातील जनतेने कुठे जावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील नागरिकांसाठी लसीचे डोस देण्यात आले असताना, तालुक्यातील नागरिकच लसीकरणापासून वंचित आहेत. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
लस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणीचे नियोजन जिल्हास्तरावर होत असल्याने पातूर तालुक्यातील नागरिक लसीपासून वंचित राहणार नाही. याकरिता ज्या लसीचे डोस उपलब्ध झाले. त्या तालुक्यातील नागरिकांनाच लस देण्यात यावी. त्यासाठी नागरिकांचे ओळखपत्र दाखवूनच त्यांना लस द्यावी, अशी मागणी पातूर तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
पातूर तालुक्यात लस घेण्यासाठी अकोल्यातून लोक येत आहेत. ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्क नसल्यामुळे आणि नोंदणी कशी करावी, याची माहिती नसल्यामुळे नागरिकांना लसीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यासाठी नागरिकांना ओळखपत्र बंधनकारक करावे आणि तालुक्यातील नागरिकांनाच लस द्यावी, असे नियोजन करावे.
- सचिन बारोकार शहराध्यक्ष भाजयुमो
पातुरातील लसीकरण केंद्रांवर अकोल्यातील नागरिकांची गर्दी होत असल्याने, तालुक्यातील नागरिकांना लस मिळत नाही. प्रशासनाने लसींबाबत नियोजन करावे. रहिवासी ठिकाणीच लस घेणे बंधनकारक करावे.
-अर्जुन टप्पे वंचित बहुजन आघाडी
लसीकरण केंद्रावर झाला वाद
पातूर येथील लसीकरण केंद्रावर एकच गर्दी झाली होती. यावेळी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत काही जणांना वाद घातला. यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला असून १८ वर्षावरील वयोगटातील युवक मोठ्या प्रमाणात नोंदणी करीत आहेत.