निर्बंध शिथिल होताच उसळली गर्दी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:16 AM2021-06-02T04:16:13+5:302021-06-02T04:16:13+5:30
लाॅकडाऊन हे कुणालाच परवडणारे नाही; मात्र कोरोनाचा वारंवार होणारा उद्रेक जिल्ह्याला लॉकडाऊनकडे ढकलतो. त्यामुळे लाॅकडाऊन हा पर्याय टाळायचा असेल ...
लाॅकडाऊन हे कुणालाच परवडणारे नाही; मात्र कोरोनाचा वारंवार होणारा उद्रेक जिल्ह्याला लॉकडाऊनकडे ढकलतो. त्यामुळे लाॅकडाऊन हा पर्याय टाळायचा असेल तर नियम पाळणे आवश्यक ठरते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येचा मोठा विस्फोट झाला. वाढत्या रुग्णसंख्येबरोबर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची भयावह संख्या समोर आली. त्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली. या नियमांची सक्त अंमलबजावणी केल्याने आता दीड महिन्यांनंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळे मंगळवारपासून जिल्ह्यात दुपारी २ पर्यंत अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक व्यावसायिकांना सूट मिळाली. जिल्ह्यातील व्यवहार सुरू झाल्यामुळे व्यापारी, व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी बाजारातील तुडुंब गर्दीमुळे प्रशासनाला मात्र कोरोना वाढण्याची चिंता लागली आहे.
ही सूट मिळाल्यानंतर मात्र जिल्ह्याची परिस्थिती पूर्वीप्रमाणेच दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी वर्दळ वाढली. रस्त्यांवर वाहनांची कोंडी झाली होती. शहरात २ नंतरही मुख्य बाजारासह रस्त्यांवर गर्दी कायम होती.
या मार्गावर सर्वाधिक गर्दी
ताजनापेठ ते जैन मंदिर व गांधी रोड, टिळक रोड, मोहम्मद अली रोड या मार्गांवर सर्वाधिक गर्दी होत आहे. सोबतच रेल्वे स्टेशन रोड, बस स्टँड चौकात वर्दळ वाढली आहे.
खरेदीला चिमुकले आवश्यक का?
अत्यावश्यक सेवेचा कालावधी वगळता रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी होत आहे. यामध्ये काही महाभाग कुटुंबासह फिरताना आढळले, तर काही जण खरेदीसाठी तेही चिमुकल्यांना सोबत घेऊन आले होते.
सूट दिली; पण बेफिकिरी टाळा!
कडक निर्बंधांमुळे सर्वच घरात बंद होते. व्यवसाय बंद असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता सूट मिळाल्यामुळे नागरिक बेफिकीर झाले आहेत. पहिल्या लाटेनंतर असेच नागरिक बेफिकीर झाल्याने दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागले आहे.
पाणीपुरीवर मारला ताव
निर्बंधांमध्ये सूट मिळाल्यानंतर नागरिक पाणीपुरीवर ताव मारताना दिसून आले. पाणीपुरीच्या गाडीजवळ तोबा गर्दी झाली होती. यावेळी अनेक जण कोरोनाच्या नियमांचे भानही विसरले होते.
साफसफाई करण्यात गेला दिवस
अत्यावश्यक सेवेत नसलेल्या दुकानांना सूट मिळाल्याने मंगळवारी ही दुकाने उघडण्यात आली होती. खूप दिवसांनी दुकान उघडण्याची वेळ आल्याने बहुतांश दुकानदारांचा दिवस साफसफाई करण्यात गेला.