अर्ज सादर करण्यासाठी उसळली गर्दी
By admin | Published: July 11, 2017 01:04 AM2017-07-11T01:04:19+5:302017-07-11T01:04:19+5:30
‘पीएम’ आवास योजना; मुदत वाढवून देण्याची नागरिकांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचे अर्ज सादर करण्यासाठी शेवटच्या दिवशी खुले नाट्यगृह कार्यालयात नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत १० जुलै होती; मात्र ही मुदत वाढवून देण्याची मागणी अकोलेकरांनी केली आहे.
केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ उपलब्ध करून दिले जातील. चार टप्प्यात राबवल्या जाणाऱ्या योजनेत सर्वप्रथम झोपडपट्टीतील गरजू लाभार्थींना प्राधान्य देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना ३२२ चौरस फूट क्षेत्रफळाचे घर उभारणे, दुसऱ्या टप्प्यात लाभार्थींना एकत्र करून त्यांच्यासाठी इमारतींमध्ये सदनिकांचे निर्माण करण्याचा समावेश राहील. लाभार्थींची स्वत:ची जागा असेल तर त्या जागेवरही घर उभारण्यासाठी अनुदान दिले जाईल.
त्यासाठी पात्र लाभार्थींना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा करण्यात आली आहे. आजपर्यंत ५८ हजार लाभार्थींनी मनपाकडे अर्ज सादर केले असून, मनपा क्षेत्रात जुने शहरातील शिवसेना वसाहत, न्यू गुरुदेव नगर, रामदासपेठ परिसरातील माता नगर आदी भागातील १ हजार २४१ घरकुलांसाठी पात्र लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत घरकुलासाठी अर्ज सादर केले नव्हते अशा नागरिकांसाठी खुले नाट्यगृह येथे १० जुलैपर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. शेवटच्या दिवशी गरजू नागरिकांनी चांगलीच गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.
निकष शिथिल करा
योजनेचे क्लिष्ट स्वरूप व पात्र लाभार्थींची संख्या पाहता घरे, इमारतींचे बांधकाम करण्यासाठी शहरातील बांधकाम व्यावसायिकांना प्रोत्साहित केले जात आहे. योजना पूर्णत्वास जाण्यासाठी निकष शिथिल करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेता स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच महापौर विजय अग्रवाल यांनी मध्यंतरी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती.