गणेश चतुर्थीला प्रवाशांची बसस्थानकावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 11:29 AM2021-09-11T11:29:17+5:302021-09-11T11:29:40+5:30
State Transport : काही दिवसांपासून बसेसला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत असून, गणेश चतुर्थीलाही बसस्थानकावर गर्दी दिसून आली.
अकोला : सलग तीन दिवस सुटी असल्याने शुक्रवारी गणेश चतुर्थीला शहरातील आगार क्रमांक २ येथे प्रवाशांची गर्दी दिसून आली. यावेळी फेऱ्यांची संख्याही वाढली असून, शेजारील जिल्ह्यात जाणाऱ्या बसेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एसटी महामंडळ अडचणीत आहे. कोरोनाच्या दुसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंधांमध्ये सूट मिळाली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची प्रवासी सेवाही सुरळीत होत आहे. गत काही दिवसांपासून बसेसला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत असून, गणेश चतुर्थीलाही बसस्थानकावर गर्दी दिसून आली. शुक्रवार ते रविवार सलग तीन दिवस सुटी असल्याने सकाळ ते दुपारी यादरम्यान अनेक प्रवासी गावाकडे जात असल्याचे निदर्शनास आले.
या मार्गावरील बसेसना प्रतिसाद
अकोला-अमरावती
अकोला-औरंगाबाद
अकोला-खामगाव
अकोला-बुलडाणा
अकोला-जळगाव
‘शिवशाही’चा शाही प्रवास नकोच!
आगार क्रमांक २ मधून ७-८ शिवशाही बसेस दररोज सोडण्यात येत असतात. तसेच इतर जिल्ह्यातील काही शिवशाही बसेसही येथे येतात; परंतु या बसेसना प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. या बसचा प्रवास खिशावरही जड होत असल्याने शिवशाहीचा शाही प्रवास नकोच, अशी भावना प्रवाशांकडून आहे.