बसस्थानकात वाढली प्रवाशांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:16 AM2021-01-18T04:16:41+5:302021-01-18T04:16:41+5:30
सोमठाणा रस्त्यांची दुरवस्था अकोला: महापालिका कार्यक्षेत्रात नव्याने आलेल्या अकोली, सोमठाणा परिसरात मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ...
सोमठाणा रस्त्यांची दुरवस्था
अकोला: महापालिका कार्यक्षेत्रात नव्याने आलेल्या अकोली, सोमठाणा परिसरात मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत. महापालिका कार्यक्षेत्रात येऊनही प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन परिसरातील रस्त्यांची नव्याने निर्मिती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पिण्याच्या पाण्याची समस्या
अकोला: हिंगणा सोमठाणा भागातील काही परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागला. परंतु, अद्यापही काही भागात जलवाहिनी पोहोचली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. जलवाहिनीचा विस्तार करून उर्वरित भागातील पाण्याची समस्या निकाली काढण्याची मागणी जगदंबा मंदिर परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
गीतानगरात सांडपाण्याची समस्या
अकोला: शहरातील गीतानगर भागात सांडपाण्याची समस्या गंभीर बनली आहे. या भागात सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाल्याच नसल्याने खुल्या भूखंडात सांडपाणी साचून राहते. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन परिसरात नाल्यांचे बांधकाम करून सांडपाण्याची समस्या निकाली काढण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
महामार्गावरील पथदिवे बंद
अकोला: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ चे निर्माणकार्य सुरू असले तरी या मार्गावर रात्रीची वाहतूक सुरू आहे. निमवाडी परिसरात मोर्णा नदीच्या पुलावरील पथदिवे बंद आहेत. या ठिकाणी वळण मार्ग असून सायंकाळपासूनच येथे खासगी प्रवासी बसेसची गर्दी होते. त्यामुळे परिसरात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता परिसरातील पथदिवे सुरू करण्याची आवश्यकता आहे.