मन व पूर्णा नदीपात्रात वाळूचोरांची गर्दी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:18 AM2021-04-20T04:18:54+5:302021-04-20T04:18:54+5:30
कोरोना महामारीवर मात करण्याकरिता शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र कोरोना निर्बंधाच्या आड अनेक अवैध व्यावसायिक आपला स्वार्थ साधून ...
कोरोना महामारीवर मात करण्याकरिता शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र कोरोना निर्बंधाच्या आड अनेक अवैध व्यावसायिक आपला स्वार्थ साधून प्रशासनाच्या नजरेसमोर कोणतीही राॅयल्टी नसताना, रेती, माती व मुरमाची अवैध वाहतूक करताना दिसत आहेत. मन नदीपात्रातील डोंगरगाव, लोहारा, कवठा, बहादुरा, निंबी, निंबा, हिंगणा निंबा, वझेगाव आदी वाळू घाटांचे लिलाव झालेले नाही. असे असतानाही या घाटांवरून सर्रास वाळू चोरी करण्यात येत आहे. पूर्णा नदीपात्रातील सोनाळा, अंदुरा, हाता, नागद, दगडखेड, स्वरूपखेड, काझीखेड या घाटांचा लिलाव झालेले नाही. या ठिकाणी सुद्धा दिवस-रात्र शेकडो ब्रास रेतीची चोरी करण्यात येत आहे. यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या वाहनांची तपासणी करण्याकरिता महसूल विभागाचे पथक कार्यान्वित नाही. महसूल विभागाचे कर्मचारी मात्र ५० टक्के उपस्थितीच्या नावाखाली वर्क फ्राॅम होम करताना दिसत आहेत. यामुळे माती, मुरूम, वाळू माफियांचे चांगलेच फावले आहे. कोरोनाकाळात वाळू माफियांनी नदी, नाल्यांची चाळण केली आहे
निंबा फाटा येथे महसूल पथक कार्यान्वित करावे
मन व पूर्णा नदीपात्रातील वाळूचोरांना अकोला येथे रेती वाहतूकीकरिता निंबा फाटा येथून जावे लागते. या ठिकाणी पोलीस चेक पोस्ट असूनही वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात येते. महसूल विभागानेही विनाराॅयल्टी रेती, माती, मुरूम वाहतुकीची तपासणी करण्याकरिता कायमस्वरूपी पथक कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे. पथक कार्यान्वित केल्यास, गौण खनिज चोरीला आळा बसेल.