जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 11:17 AM2021-04-14T11:17:11+5:302021-04-14T11:19:36+5:30
Crowd in Akola Market : जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे मंगळवारी पहावयास मिळाले.
अकाेला : जीवघेण्या काेराेना विषाणूचा वाढता कहर लक्षात घेता राज्य शासनाकडून काेणत्याही क्षणी लाॅकडाऊन लागू केले जाणार असल्याची शक्यता मंगळवारी सायंकाळी खरी ठरली. लाॅकडाऊन लागू हाेणार असल्याच्या धास्तीपाेटी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे मंगळवारी पहावयास मिळाले. यामध्ये किराणा दुकानांमध्ये माेठ्या संख्येने ग्राहक असल्याचे दिसून आले.
काेराेना विषाणूचा वेगाने हाेणारा प्रसार लक्षात घेता २४ मार्च २०२० राेजी केंद्र शासनाने काेराेनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशातून लाॅकडाऊन लागू केले हाेते. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी अचानक लाॅकडाऊनची घाेषणा केल्यामुळे हातावर पाेट असणाऱ्या मजूर वर्गाची गावाकडे परत जाण्यासाठी एकच धांदल उडाली हाेती. दरम्यान, राज्यात काेराेनाचा प्रभाव ओसरत असल्याचे पाहून शासनाने १ जूनपासून टप्प्याटप्प्याने ‘अनलाॅक’ला सुरुवात केली हाेती. काेराेना संपण्याची चिन्हं दिसत असतानाच जानेवारी महिन्यापासून पुन्हा एकदा काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समाेर आले आहे. वर्तमानस्थिती लक्षात घेता राज्यात काेराेनाची माेठी लाट आली असून, शासकीय वैद्यकीय यंत्रणा असाे वा खासगी रुग्णालयांमध्ये काेराेनाबाधित रुग्णांसाठी खाटांची कमतरता निर्माण झाली आहे. व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन व अत्यावश्यक औषधींचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. काेराेनाच्या वाढत्या प्रसाराला नागरिकांचा गाफीलपणा कारणीभूत ठरला आहे. या परिस्थितीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने मध्यंतरी ‘ब्रेक द चेन’चे आवाहन केले हाेते. बिकट परिस्थिती लक्षात घेता काेणत्याही क्षण लाॅकडाऊनची घाेषणा हाेण्याची दाट शक्यता गृहीत धरून अकाेलेकरांनी मंगळवारी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केल्याचे चित्र हाेते.
बाजारात उसळली गर्दी
राज्य सरकारकडून किमान १५ दिवसांचा लाॅकडाऊन लागू केला जाणार असला तरी यामध्ये वाढ हाेण्याच्या विचारातून सर्वसामान्य नागरिकांनी कडधान्य खरेदीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. शहरातील दाणा बाजारात गहू, ज्वारीसह उडीद दाळ, मूग दाळ, हरभरा दाळ, तांदूळ आदी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड हाेती.
लाॅकडाऊनची शक्यता गृहीत धरून नाेकरवर्गाने महिनाभर पुरेल इतका किराणा घेतला; परंतु हातावर पाेट असणाऱ्यांनी किमान आठ दिवस पुरेल एवढेच साहित्य खरेदी केले. यावरून नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे दिसून येते. शासनाने लाॅकडाऊनच्या निर्बंधातून किराणा दुकानांना वगळल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
- राजेश शेळके, व्यावसायिक, किराणा दुकान