लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी; संसर्गाचा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:19 AM2021-05-08T04:19:26+5:302021-05-08T04:19:26+5:30
बार्शिटाकळी : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम राबविण्यात ...
बार्शिटाकळी : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे; मात्र ही मोहीम राबविताना नियोजनाअभावी कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्याऐवजी कोरोनाला आमंत्रण दिले जात असल्याचे चित्र आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी उसळत असून, या वेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे ६ मे रोजी दिसून आले.
तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र नागरिकांकडून कडक निर्बंधांच्या नियमांचे पालन होत नसताना दिसत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यासाठी नागरिकांनी परिसरात एकच गर्दी केली होती; या वेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. लसीकरण केंद्रात लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने काही नागरिकांना खाली हात परतावे लागले. लसीकरण केंद्राच्या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. (फोटो)
-----------------------------------
लसीकरण की कोरोनाला निमंत्रण?
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरू असून, लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. प्रशासनाच्या नियोजनाअभावी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून, लसीकरण हे कोरोनाला निमंत्रण देत असल्याचे चित्र आहे. प्रशासनामार्फत नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे सांगण्यात येते; मात्र नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.
-----------------------------
भांबेरी येथील केंद्रात लसींचा तुटवडा
भांबेरी येथील आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरू आहे. दरम्यान, आरोग्य केंद्रात लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना घरी परतावे लागले. या वेळी लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. लसीकरण केंद्राबाहेर फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. (फोटो)