ओळखपत्रांसाठी दुकानदारांची पुरवठा विभागात गर्दी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:14 PM2020-03-27T18:14:03+5:302020-03-27T18:14:15+5:30
२७ मार्चपर्यंत शहरातील १५० दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत ओळखपत्र देण्यात आले.
अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुषंगाने ओळखपत्रासाठी शहरातील किराणा व धान्य दुकानदारांची शुक्रवारी जिल्हा पुरवठा विभागाच्या कार्यालयात गर्दी झाली होती. २७ मार्चपर्यंत शहरातील १५० दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत ओळखपत्र देण्यात आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात २४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार ओळखपत्र मिळविण्यासाठी अकोला शहरातील किराणा व धान्य दुकानदारांची जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात गर्दी होत आहे. शुक्रवार, २७ मार्च रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात ओळखपत्रासाठी दुकानदारांच्या रांगा लागल्या होत्या. २७ मार्चपर्यंत अकोला शहरातील १५० दुकानदारांना ओळखपत्र देण्यात आले, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यू. काळे यांनी दिली.