लॉकडाऊनपूर्वी अकोल्यातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी केली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 07:03 PM2021-02-22T19:03:08+5:302021-02-22T19:09:25+5:30
Lockdown in Akola रविवारी दिवसभर घरात बसलेल्या नागरिकांनी साेमवारी बाजारात चांगलीच गर्दी केली.
अकाेला : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी संपूर्ण संचारबंदीचे आदेश दिले हाेते. अकाेलेकरांनी या संचारबंदीला गांभीर्याने घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुसरीकडे रविवारी संध्याकाळीच अकाेला, अकाेट व मूर्तिजापूर ही शहरी क्षेत्रे प्रतिबंधात्मक घाेषित करून मंगळवारपासून लाॅकडाऊनची घाेषणा करण्यात आली. त्यामुळे अकाेलेकरांना साेमवार हा एकमेव दिवस माेकळा मिळाला हाेता. रविवारी दिवसभर घरात बसलेल्या नागरिकांनी साेमवारी बाजारात चांगलीच गर्दी केली.
विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागिरकांची झुंबड हाेतीच, मात्र दारूचा साठा करून ठेवण्यासाठी तळीरामांनी दारूच्या दुकानांवर गर्दी केली हाेती. ३६ तासांच्या संचारबंदीनंतर नागरिकांचा मुक्तसंचार दिसून आला. ' फिजिकल डिस्टन्सिंग'', मास्क या सर्व नियमांना पायदळी तुडविल्याचे चित्र शहरात सर्वत्रच दिसून आले. या गर्दीतून नागरिकांनी काेराेना घरी तर नाही नेला नाही ना, अशी शंका उपस्थित हाेत आहे.
विवध शासकीय कार्यालयांमध्येही सोमवारी मोठी गर्दी पाहावयास मिळाली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातीलच नोंदणी व मुद्रांक विभागासमोर नागरिकांची गर्दी होत असल्याने '' फिजिकल डिस्टन्सिंग'' चा फज्जा उडत असल्याचे वास्तव सोमवारी समोर आले.