सीआरपीएफ जवानाचा कर्तव्यावर मृत्यू!

By admin | Published: April 7, 2017 01:24 AM2017-04-07T01:24:04+5:302017-04-07T01:24:04+5:30

अकोला- मोमिनपुरा राहणारे सीआरपीएफ जवान मुजीब अहमद शेख अब्दुला यांचे तळेगाव (पुणे) येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

CRPF jawans die on duty! | सीआरपीएफ जवानाचा कर्तव्यावर मृत्यू!

सीआरपीएफ जवानाचा कर्तव्यावर मृत्यू!

Next

अकोला : मोमिनपुरा परिसरातील अतरा गल्लीत राहणारे सीआरपीएफ जवान मुजीब अहमद शेख अब्दुला यांचे तळेगाव (पुणे) येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी अकोल्यात पोहोचल्यावर मोहता मिल रोडवरील कब्रस्थानमध्ये शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली.
मुजीब अहमद हे १९९१ मध्ये बिहार सीआरपीएफमध्ये रुजू झाले. त्यानंतर त्यांनी छत्तीसगड, जम्मू-काश्मीर या ठिकाणी सेवा दिली. नंतर तळेगाव (पुणे) सीआरपीएफ जवान म्हणून तैनात झाले. बुधवारी कर्तव्यावर असताना, मुजीब यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी अकोल्यात पोहोचल्यावर पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांचे पार्थिव मोहता मिल रोडवरील कब्रस्थानमध्ये पोहोचल्यावर मौलाना अलहाज अब्दुल जब्बार मजाहरी यांच्या मार्गदर्शनात नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर रिझर्व्ह पोलीस फोर्स व अकोला पोलिसांनी त्यांच्या सन्मानार्थ बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. यावेळी पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, रामदासपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश सावकार, तळेगाव येथील सीआरपीएफचे एएसआय एस.एस. हिवराळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुजीब अहमद यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना मानवंदना दिली.

अन् कुटुंबाची भेट राहिली...
सीआरपीएफ जवान मुजीब अहमद यांची पदोन्नतीवर अरुणाचल प्रदेश बदली झाली. त्यामुळे ते अरुणाचलला जाण्यापूर्वी अकोल्यात येऊन त्यांच्या कुटुंबीयांची, पत्नी, मुलांची व मुलीची भेट घेणार होते. त्यांनी ६ एप्रिल रोजी पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस रेल्वेगाडीमध्ये आरक्षणसुद्धा केले होते. मुजीब अहमद घरी येणार असल्याने, त्यांच्या घरी आनंदाचे वातावरण होते; परंतु त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि त्यांना हिरावून नेले. त्यांच्या येण्याची वाट पाहणाऱ्या कुटुंबांचा आनंद क्षणात नाहीसा झाला.

जिल्हा प्रशासनाचा एकही प्रतिनिधी हजर नाही
शहीद जवान किंवा कर्तव्यावरील जवानाचे निधन झाल्यावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित असतात; परंतु गुरुवारी जवान मुजीब अहमद यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जिल्हा प्रशासनाकडून जवानाला मानवंदना देण्यासाठी एकही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीविषयी चर्चा रंगली होती.

Web Title: CRPF jawans die on duty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.