करोडपती वाणाचे सोयाबीन ठरले निकृष्ट!
By Admin | Published: September 16, 2014 06:34 PM2014-09-16T18:34:58+5:302014-09-16T18:34:58+5:30
शेतकर्यांनी उभे पीक उपटून फेकले
धाड : करोडपती नावाचे वाण असलेल्या सोयाबीन पिकास फूल व फळ धारणा होत नसून, सोयाबीन पीक निकृष्ट निघाल्याने धाड भागात शेतकर्यांनी उभे हिरवे सोयाबीन उपटून फेकण्यास सुरुवात केली आहे.
बुलडाणा तालुक्यातील धाड परिसरात कधी निसर्गाचे संकट तर कधी सुलतानी संकटाने अगोदरच हवालदिल झालेल्या शेतकर्यांवर शेतामधील उभे हिरवे पीकच उपटून टाकण्याची वेळ येऊन ठेपल्याने शेतकरी आर्थिक संकटात चांगलाच फसला आहे.
गेल्या काही वर्षात धाड व परिसरात शेतकर्यांचा कल हा कमी खर्चात अधिक उत्पन्न देणार्या सोयाबीन पिकाकडे झाला असून, या भागात सर्वाधिक प्रमाणात सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात येते.
मागील दोन वर्षांपासून धाड भागात ह्यकरोडपतीह्ण नावाने सोयाबीनचे नवे वाण बाजारात आले. हे पीक एकरी १५ ते १८ क्विंटलपर्यंत उत्पन्न देत असल्याने या वाणाची पेरणी यावर्षी अंदाजे ५00 एकरावर झाली आहे.
या वाणाच्या पिकास फूल व फळधारणा झाली नसल्याने शेतकरीवर्ग पुरता हवालदिल झाला. टोकण पद्धतीने लागवड केलेल्या या वाणास झडती चांगली येत असल्याने शेतकर्यांनी अधिक प्रमाणात यावर खर्च केला आहे.
अधिक उत्पन्न पदरी पडण्याची आशा बाळगून असलेल्या शेतकर्यांवर निसर्गाने घाला घातला असून, सध्या हतबल झालेल्या शेतकर्यांनी शेवटी नाइलाजास्तव सोयाबीन पीक उपटणे सुरू केले.
करोडपती नावाने उदयास आलेल्या सोयाबीन पिकांचे झाडांना फुले व फळे लागण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकर्यांनी कृषी केंद्रधारकांना सल्ला विचारून महागडे औषध फवारले; मात्र परिणाम शून्य आल्याने शेवटी उभे हिरवे पीक उपटून टाकण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय उरला नाही.
अगोदरच निसर्गाच्या सततच्या संकटांनी दबलेल्या शेतकर्यांना आणखी एका संकटास सामोरे जाण्याची वेळ आली आहे. करोडपती नावाने व टोकण पद्धतीने पेरणी केलेले सोयाबीन पीक सध्या पिवळे पडले असून, सोयाबीन सुकण्याच्या मार्गावर आहे. या स्थितीने हैराण झालेल्या शेतकर्यांनी शेवटी सोयाबीन उपटणे सुरू केले; मात्र या भागात खरिपाचे सोयाबीन पीक धोक्यात सापडले असताना कृषी विभागास याबाबत साधी माहिती नसल्याने कार्यवाही केली नाही वा शेतकर्यांना मार्गदर्शन केले नाही. परिणामी या भागात शेतकरी वर्गातून रोष व्यक्त होत आहे. या भागात नुकसानग्रस्त शेतकर्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी समोर येत आहे.