आरटीपीसीआर निगेटिव्ह रुग्णांचाही सीटी स्कोअर चिंताजनक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:18 AM2021-04-11T04:18:29+5:302021-04-11T04:18:29+5:30
नव्या वर्षात फेब्रुवारीपासूनच कोरोनाने कहर करण्यास सुरुवात केली आहे. मार्चनंतर आता एप्रिलमध्येही कोविडच्या गंभीर रुग्णांसोबतच मृत्यूची संख्याही झपाट्याने वाढत ...
नव्या वर्षात फेब्रुवारीपासूनच कोरोनाने कहर करण्यास सुरुवात केली आहे. मार्चनंतर आता एप्रिलमध्येही कोविडच्या गंभीर रुग्णांसोबतच मृत्यूची संख्याही झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांसोबतच आरटीपीसीआरचा अहवाल निगेटिव्ह असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे दिसून येत आहेत. सीटी स्कॅनच्या अहवालात रुग्णांना संक्रमण झाल्याचे अनेक रुग्णांमध्ये दिसून येत आहे. अशा रुग्णांवर कोविड ऐवजी न्युमोनियाचा रुग्ण म्हणून काही ठिकाणी उपचार केला जात आहे. या रुग्णांना योग्य वेळी योग्य उपचार न झाल्यास त्यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. शिवाय, अशा रुग्णांना सामान्य वॉर्डात उपचारासाठी ठेवल्यास त्यांच्यापासून इतर नॉनकोविड रुग्णांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रॅपिड किंवा आरटीपीसीआर अहवालालाच मान्यता
सद्यस्थितीत रॅपिड तसेच आरटीपीसीआर चाचणीसोबतच सीटी स्कॅनद्वारे कोविडची चाचणी करण्याचे प्रमाण वाढले आहे, मात्र रॅपिड आणि आरटीपीसीआर वगळल्यास इतर कुठल्याच चाचणीला मान्यता नाही. त्यामुळे सीटी स्कॅनच्या अहवालानुसार रुग्णाची स्थिती चिंताजनक असली, तरी त्याला कोविड रुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात येत नसल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
स्वतंत्र वॉर्डात उपचाराची गरज
आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असला, तरी सीटी स्कोअर आणि रुग्णाला असलेल्या कोविडच्या लक्षणांमुळे रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. या रुग्णांकडून इतरांनाही संसर्ग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा रुग्णांवर कोविड वॉर्डात किंवा स्वतंत्र वॉर्डात उपचार करण्याची गरज असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
ही आहेत रुग्णांमध्ये लक्षणे
श्वास घेण्यास त्रास
सुगंध किंवा दुर्गंध न येणे
जिभेला चव नसणे
ताप येणे
सर्दी, खोकला