सांस्कृतिक आक्रमण, कलेचे व्यावसायिकरणामुळे लोककला संकटात - प्रा. डॉ. दिलीप अलोणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 06:14 PM2018-09-28T18:14:46+5:302018-09-29T12:24:22+5:30
लोककलेला राजाश्रय नाही आणि आताच्या तरूणांमध्ये लोककला शिकण्याची गरज वाटत नाही. झटपट अभिनय करून पैसा मिळविण्याकडे सध्याच्या कलावंताचा कल आहे. अशी खंत भारतीय कलावंत परिषदेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध नकलाकार प्रा. डॉ. दिलीप अलोणे(वणी)यांनी व्यक्त केले.
- नितीन गव्हाळे
अकोला: सांस्कृतिक आक्रमण वाढले आहे. कला क्षेत्रातून लोकजागृती ही परंपरा मागे पडून त्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे लोककला संकटात सापडली आहे. लोककलेला राजाश्रय नाही आणि आताच्या तरूणांमध्ये लोककला शिकण्याची गरज वाटत नाही. झटपट अभिनय करून पैसा मिळविण्याकडे सध्याच्या कलावंताचा कल आहे. अशी खंत भारतीय कलावंत परिषदेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध नकलाकार प्रा. डॉ. दिलीप अलोणे(वणी)यांनी व्यक्त केले. संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीच्यावतीने शिवाजी महाविद्यालयात आयोजित युवा महोत्सवामध्ये परिक्षक म्हणून ते अकोल्यात आले आहेत. त्यांनी शुक्रवारी लोकमतसोबत संवाद साधला.
प्रश्न: पूर्वीच्या आणि आताच्या युवा महोत्सवामध्ये काय बदल झाला?
उत्तर: मी १९८५ पासून विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये काम करतो आहे. त्यावेळेस कलेची फारसी जाण नव्हती. मोजकेच तरूण-तरूणी युवा महोत्सवात सहभागी व्हायचे. परंतु विद्यापीठाचा आणि महाविद्यालयांचा विस्तार झाला आहे. संख्या वाढली. आता तुलनेने सुविधा उपलब्ध आहेत. युवा कलावंत गुणी आहेत. त्यांच्या मनात असलेली सामाजिक जाणीव, वास्तवातील प्रश्न ते व्यासपीठावर व्यक्त करीत आहेत. अंतरभावना मोकळीत करून देणारं युवा महोत्सव हे मोठे व्यासपीठ आहे. यातून अनेक कलावंत घडले आहेत. पुसदच्या ग्रामीण भागातील अंकूर वाढवे नावाचा कलावंत चला हवा येऊ द्या च्या व्यासपीठावर झळकला. ही युवा महोत्सवाची देण आहे. महाविद्यालय, प्राध्यापकांनी कला जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, तयारी करून घेण्याची गरज आहे.
प्रश्न: नकला हा कोणता प्रकार आहे?
उत्तर: नकला ही विदर्भाचा अत्यंत लोकप्रिय लोककला आहे. मनोरंजनातून समाजातील कु-प्रथा, रूढी, परंपरा यावर प्रहार करून लोकजागृती करावी. नकलांच्या माध्यमातून मार्मिक भाष्य करून जनजागृती करता येते.
प्रश्न: नकला करण्याची प्रेरणा कशी मिळाली?
उत्तर: विदर्भात स्व. नाना रेटर हे मोठे नकलाकार होते. पूर्वी गणेशोत्सव, दुर्गाउत्सवामध्ये नकलांचे कार्यक्रम व्हायचे. त्यांचा चंद्रपुरात असाच कार्यक्रम होता. परंतु त्यांना यायला उशिर झाल्यामुळे मला संधी मिळाली आणि मी काही नकला सादर केल्या. त्यांनी त्या नकला पाहिल्या. कौतुक केले आणि त्यातून माझ्यातील नकलाकार उदयास आला.
प्रश्न: कला क्षेत्रात किती वर्षांपासून कार्यरत आहात?
उत्तर: १९७२ पासून कला क्षेत्रात काम करतो आहोत. उपेक्षित कलावंतासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी १९८४ मध्ये भारतीय कलावंत परिषदेची स्थापना केली. नकला कला प्रकारासाठी पहिल्यांदा शासनाचा पुरस्कार मिळाला. तसेच भारत सरकारच्या दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र नियामक मंडळाचा सदस्य म्हणूनही काम केले आहे. साक्षरतेवर अक्षर किमया, शेतकरी आत्महत्येवर गर्भात मातीच्य हा चित्रपट काढला. अशोक पवार यांच्या बिºहाड कादंबरीवर लघुपटाची निर्मिती केली.
प्रश्न: नकला आणि मिमिक्रीमध्ये काय फरक आहे?
उत्तर: मिमिक्री ही नेते, अभिनेते किंवा कोणाचीही करता येते. आवाजाची, देहबोलीची नक्कल म्हणजे मिमिक्री. नकला ही लोककला करमणूक करणारी बहुरूपी आणि जागृती करणारी कीर्तन परंपरा आहे.