क्यूरिंगअभावी गोरक्षण मार्ग निकृष्ट
By admin | Published: May 9, 2017 02:46 AM2017-05-09T02:46:33+5:302017-05-09T02:46:33+5:30
नवीन मार्गावर खड्डे ; वाफ्यांऐवजी फाटक्या गोण्यांचा वापर.
अकोला: नऊ कोटींच्या खर्चातून साकारत असलेल्या गोरक्षणच्या काँक्रिट मार्गाचे क्यूरिंग होत नसल्याने त्याचा दर्जा निकृष्ट होत आहे. त्यामुळे या मार्गावरील पहिला स्तर तयार होताच त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच दखल देऊन या मार्गाच्या दर्जाकडे लक्ष देण्याची मागणी अकोलेकरांकडून होत आहे.
नेहरूपार्क ते तुकाराम चौकापर्यंंतच्या मार्ग काँक्रिटीकरणाचे काम टप्प्या-टप्प्याने केले जात आहे. यातील नेहरू पार्क ते गोरक्षण पर्यतचे काम तब्बल दीड वर्षांपासून सुरू आहे.हे काम नऊ कोटींच्या निधीतून होत आहे.
अत्यंत संथ गतीने होत असलेल्या या बांधकामामुळे आधीच अकोलेकर त्रस्त असून, त्यात या कामाचा दर्जादेखील राखला जात नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. काँक्रिट मार्गावर वाफे बांधून क्यूरिंग करणे गरजेचे असताना कंत्राटदाराने फाटक्या गोण्यांचा वापर करून क्यूरिंग देण्याचा प्रयोग येथे केला. त्यामुळे गोरक्षण ते पुढील भागाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. वेळीच पाणी न मिळाल्याने या नवीन मार्गावर खड्डे पडले आहेत.
कामाच्या दर्जाची पाहणी केली जाईल. पारेषण कार्यालय ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंंतच्या वादग्रस्त अतिक्रमणाचा विषय महापालिकेने तातडीने न सोडविल्यास पुढचे काम सार्वजनिक बांधकाम घेणार नाही. निविदेच्या करारात मार्गावरील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे. त्यांनी तातडीने योग्य ती कारवाई करावी, अन्यथा पुढच्या बांधकामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार नाही.
- जी.व्ही. जोशी,
अधीक्षक अभियंता,
सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला.