संचारबंदीचा भाजीबाजाराला फटका; उलाढाल निम्म्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:17 AM2021-05-01T04:17:01+5:302021-05-01T04:17:01+5:30

अकोला : कोरोनाच्या संकटामुळे सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता आठवडी बाजार बंद आहे. भाजीपाला बाजारालाही वेळेचे ...

Curfew hits vegetable market; Turnover halved! | संचारबंदीचा भाजीबाजाराला फटका; उलाढाल निम्म्यावर!

संचारबंदीचा भाजीबाजाराला फटका; उलाढाल निम्म्यावर!

Next

अकोला : कोरोनाच्या संकटामुळे सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता आठवडी बाजार बंद आहे. भाजीपाला बाजारालाही वेळेचे निर्बंध आहे. त्याचे परिणाम भाजी बाजारात पाहायला मिळत आहे. येथे विक्रीला येणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची उलाढाल निम्म्यावर आली आहे. दररोज केवळ १००-१२० क्विंटल आवक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात संचारबंदी असल्याने सर्वच व्यवसायावर निर्बंध आले आहे. भाजीपाल्याच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. अकोल्यासह बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील व्यापारी येथील भाजीपाला मोठ्या प्रमाणात खरेदी करतात; मात्र ग्रामीण भागातील आठवडी बाजार ३० एप्रिलपर्यंत बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या मालाला समाधानकारक दर मिळत नाही. परिणामी, शेतकरी हैराण झाला आहे. शहरातील भाजी बाजार सुरू आहे; पण त्यालाही वेळेचे बंधन आहे. शहरात भाजीपाला फिरून विक्रीला परवानगी दिली आहे. त्यालाही सकाळी ७ ते ११ पर्यंत वेळेचे बंधन घातले आहे. त्याचबरोबर गावोगावचे आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे उत्पादन केलेला माल घ्यायला व्यापारी उत्सुक नाहीत. खरेदी केला तर तो विकायचा कुठे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. या सगळ्याचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्याला बसत आहे.

दर चांगला मिळत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला शेतातच पडून आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाचा तोडाच केलेला नाही किंवा माल काढलेला नाही. व्यापाऱ्यांना फोन करून माल घेऊन येऊ का, असे विचारले असता, मालाला ग्राहक नाही; चांगला दर मिळत नाही, असे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे पिकवलेल्या या मालाचे करायचे काय, या विचाराने शेतकरी चिंतित आहे.

--बॉक्स--

शुक्रवारचे होलसेल दर किलोमध्ये

वांगी - १० ते १२ रुपये

टोमॅटो - १२ ते १५ रुपये

भेंडी - १२ ते १५ रुपये

कारले - १५ ते १८ रुपये

गवार - २५ ते ३० रुपये

हिरवी मिरची - २० ते २५ रुपये

काकडी - १२ ते १५ रुपये

हिरवा कांदा - २० ते २५ रुपये

कांदा - १२ ते १५ रुपये

बटाटा - १० ते १५ रुपये

लसूण - ४० ते ६० रुपये

--बॉक्स--

भाजीपाला फेकून देण्याची वेळ

जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद आहे. त्यामुळे शेतमालाची उलाढाल ठप्प झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांवर भाजीपाला बाजारपेठेत न आणता शेतातच फेकून देण्याची वेळ आली आहे.

--बॉक्स--

चार तासांत विक्री होणार तरी किती?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमध्ये भाजीपाला विक्रीला केवळ चार तास मिळत आहे. त्यामुळे या वेळात भाजीपाला विक्री होणार तरी किती, असा प्रश्न निर्माण होत आहे. या वेळेच्या निर्बंधांमुळे भाजीपाला विक्री कमी होत आहे. त्यामुळे व्यापारीही माल घेण्यास तयार नाही.

--कोट--

कोरोनामुळे आठवडी बाजार बंद आहे. याचा परिणाम भाजीपाला व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे मालाला उठाव नाही. जो माल विक्री केला जातो त्याला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.

अनंता चिंचोळकर, व्यापारी

--कोट--

शेतात कोबी, टमाटर पडलेले आहे. बाजारात दर नसल्याने मालाचा खर्चही निघत नाही. संचारबंदीमुळे आता भाजीपाल्याचा दर वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मोठे संकट उभे राहिले आहे.

- दामोदर बर्डे, भाजीपाला उत्पादक शेतकरी, देऊळगाव

Web Title: Curfew hits vegetable market; Turnover halved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.